नापिकीमुळे गावराणी आंबा झाला दुर्मिळ; भावही वधारले

By Admin | Updated: May 15, 2016 01:49 IST2016-05-15T01:49:00+5:302016-05-15T01:49:00+5:30

ग्रामीण परिसरात गावराणी आंबा दिसेनासा झाला आहे. यावर्षी आंब्याची नापिकी असल्याने भावही वधारले आहेत.

Mango becomes rare due to nutrition; The price rose | नापिकीमुळे गावराणी आंबा झाला दुर्मिळ; भावही वधारले

नापिकीमुळे गावराणी आंबा झाला दुर्मिळ; भावही वधारले

भाव १०० रुपये किलो : एकाच वृद्ध दाम्पत्याकडून होते लाडू आंब्याची शहरात विक्री
कारंजा (घा.) : ग्रामीण परिसरात गावराणी आंबा दिसेनासा झाला आहे. यावर्षी आंब्याची नापिकी असल्याने भावही वधारले आहेत. चांगल्या प्रतिचा आंबा १०० रुपये प्रती किलो विकला जात असल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यात १५ वर्षांपूर्वी गावराणी आंब्याचा सुकाळ होता. लाडू, खोबरा, साखऱ्या, राजा, राणी या विविध टोपण नावाने एकाहून एक सरस गुणधर्म आणि चव असलेले आंबे येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात विकायला येत होते. सकाळी ६ वाजता पासून तर ११ वाजेपर्यंत ग्रामीण भागातून आलेल्या आंब्याची विक्री होत होती. २० ते २५ रुपये किलो भाव राहत होता. उमरी, धावसा, मदनी, चंदेवाणी, नारा, तरोडा, काकडा, सावळी, बोंदरठाणा, आजनडोह, मानीकवाडा, जुनापाणी, सेलगाव, बांगडापूर, धानोली, काजळी या सारख्या अनेक गावांत आंब्याच्या ‘आमराई’ दिसत होत्या. उन्हाळ्यात प्रारंभी कच्चे आंबे, नंतर पिकलेले आंबे विकण्याचा मोठा व्यवसाय प्रत्येक गावात चालत होता. आलेल्या पाहुण्यांना एकाहून एक सरस रसांचा मनसोक्त पाहुणचार होत होता; पण आज ते दिवस राहिले नाहीत.
अनेक शेतकऱ्यांनी या झाडावर वानरे येतात, झाडांच्या सावलीमुळे अन्य पिके होत नाहीत आणि उन्हात या आंब्याची राखण कशी करायची, या अनेक समस्यांमुळे ही आंब्यांची झाडे विकली. आपल्याला थोडाफार पैसा मिळेल म्हणूनही क्षणिक स्वार्थापोटी आंब्याची उभी झाडे आरामशीन धारकांना विकण्यात आली. सध्या कारंजा तालुक्यात आंब्याची झाडे नामशेष होत चालली आहे. परिणामी, चांगले आंबे खायला मिळणे, दुर्मीळ झाले आहे. आंब्याचा तालुका म्हणून एकेकाळी नावलौकिक असलेल्या कारंजा तालुक्यात आज नावालाही गावराणी आंबे शिल्लक राहिले नाहीत. रासायनिक पदार्थाने पिकविलेले आरोग्यास हानीकारक इतर जातीचे आंबे खावे लागत आहेत.
तालुक्यात मोठ-मोठ्या संत्रा बागा आहे. संत्रा दुसरीकडे पाठवायचा असल्यास लाकडी पेट्यांमध्ये द्यावा जातो. या पेट्या तयार करण्यासाठी आंब्याची खोड वापरली जाते. यामुळे अनेक संत्रा व्यापाऱ्यांनी आंब्याची उभी झाडे विकत घेऊन त्यापासून पेट्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केल्याचेही दिसून येत आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही चिरीमरी घेऊन झाडे कटाईला परवानगी दिल्याचे दिसते. परिणामी, आज गावराणी आंब्याची झाडे आणि आंबे दिसेनासेच झाले आहेत.
बसस्थानक परिसर, गोळीबार चौकात या महिन्यात एकेकाळी गावराणी आंबे विकणाऱ्यांची मोठी रांग लागत होती. एकाहून एक सरस चवीचे आंबे पाच वर्षांपूर्वी २० ते २५ रुपये किलो मिळायचे; पण आजच्या घडीला गावराणी आंबे विकायलाच येत नसल्याचे दिसते. आजनडोह येथील वयोवृद्ध दयारामजी रमधम आणि त्यांच्या पत्नीने अत्यंत मेहनतीने जोपासलेल्या लाडू आंब्याला यावर्षी नापिकी असतानाही भरपूर आंबे आलेत. दररोज हे जोडपे शहरात ५० किलो आंबे आणतात. १०० रुपये किलो दराने ते विकतात. आंब्याची चव व गुणवत्ता चांगली असल्यामुळे सकाळी दोन तासांतच आंबा विकला जातो. यातून ते आपला उदरनिर्वाह करतात.(तालुका प्रतिनिधी)

आंब्याची विशाल झाडे झाली नामशेष
रोहणा : उन्हाळ्यात गावराणी आंब्याच्या रसाची चव चाखायचे दिवस कालबाह्य झाले आहे. ग्रामीण भागातूनही गावराणी आंबे दुर्मीळ झाले आहे. परिणामी, अनैसर्गिकरित्या रसायनाने पिकविलेल्या आंब्याचा रस खाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
शेताच्या बांधावर आंब्याची झाडे, रस्त्याच्या दुतर्फा आमराई, प्रत्येक शेतात स्वत:चे एक आंब्याचे झाड असलेच पाहिजे, ही शेतकऱ्यांची मानसिकता संपली आहे. आंब्याच्या झाडांची दरम्यानच्या काळात प्रचंड कत्तल झाली. नवीन आंब्याचे झाड लावून त्याचे संवर्धन करण्याबाबत उदासीनता असल्याने गावराणी आंब्याची विशाल झाडे नामशेष झालीत. परिणामी, ग्रामीण भागात घरोघरी गवतात वा मोहपानात लावलेले आंब्याचे माच नैसर्गिकरित्या पिकलेले आंबे चोखणे, रस या बाबी कालबाह्य झाल्यात. जी काही आंब्याची झाडे आहे, त्यांनाही वाढत्या तापमानामुळे योग्य फळधारणा होत नाही. परिणामी, गावराणी आंब्याचा रस व लोणचे दुर्मिळ झाले. रसायनाने पिकविलेल्या पेवंदी आंब्याच्या रसाशिवाय पर्याय नाही. या रसाचा आरोग्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यताच अधिक असते. वृक्ष लागवड व संवर्धनासाठी शासन प्रयत्न करीत असताना अपेक्षित बदल दिसत नाही. शेतातील आंब्याचे झाड सावली, फळे देण्यासह मातीची धुप थांबविते. पावसाचे पाणी शेतात मुरण्यास मदत होते; पण याकडे दुर्लक्षच आहे.(वार्ताहर)

Web Title: Mango becomes rare due to nutrition; The price rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.