लहान मुलांच्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने, निघाल्या तलवारीसह कुऱ्हाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 18:55 IST2022-01-10T18:50:18+5:302022-01-10T18:55:56+5:30
अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांच्या झालेल्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने आली असून तलवारी अन् कुऱ्हाडी निघाल्या. ही घटना तारफैल परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली.

लहान मुलांच्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने, निघाल्या तलवारीसह कुऱ्हाडी
वर्धा : अंगणात खेळणाऱ्या लहान मुलांच्या झालेल्या वादातून दोन कुटुंबे आमने-सामने आली असून तलवारी अन् कुऱ्हाडी निघाल्या. ही घटना तारफैल परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
शेख अनिस शेख अहमद याच्या तक्रारीनुसार, अनिसचा मुलगा अमोल शंभरकर याच्या मुलाशी अंगणात खेळत असताना त्यांच्यात वाद झाला. त्या कारणातून अमोल शंभरकर आणि विजय शंभरकर यांनी अहमदच्या घरासमोर जात तुझ्या मुलाला सांभाळता येत नाही का, तू माझ्या मुलाला का रागाविले, असे म्हणून शिवीगाळ करीत तलवारीने त्याच्या तीन बोटांवर मारून जखमी केले. अहमदची पत्नी वाद सोडविण्यास गेली असता तिच्या बोटालाही दुखापत केल्याची तक्रार दिली.
तर अमोल महेंद्र शंभरकर याने दिलेल्या तक्रारीनुसार, अमोल त्याच्या दोन्ही मुलांना घरी घेऊन जात असताना अनिस शेख हा आला आणि तुझ्या मुलांना विष देऊन मारून टाकतो, असे म्हणत वाद केला. तसेच त्याची पत्नी रुबीना आणि तिची बहीण शबीना या दोघींनी अमोलच्या पत्नीलाही मारहाण केली. त्यांचा वाद सोडविण्यास अमोल गेला असता त्याला कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. तसेच विजय शंभरकर यालाही दगडाने मारहाण करीत जखमी केल्याची तक्रार दाखल केली. या दोन्ही घटनांचा तपास शहर पोलीस करीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.