विनोद घोडेलोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामनी) : चाराटंचाईमुळे गुरांच्या बाजारात दर आठवड्याला विक्रीसाठी आलेल्या जनावरांची संख्या वाढत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे, बैलजोडीची किंमतही लाखात गेल्यामुळे बैलजोडी सांभाळणे सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेर गेले आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शेतीची विभागणी झाल्याने बहुतांश शेतकरी अल्पभूधारक झाला आहे. याशिवाय जिल्ह्यात चाराटंचाई असल्याने चाऱ्याच्या दराने डिझेलची बरोबरी गाठली आहे. परिणामी बैलजोडी सांभाळणे कठीण झाले आहे.
हल्लीच्या काळात अल्पभूधारक शेतकऱ्यांना ना बैलजोडीच्या साह्याने शेती करणे परवडते ना ट्रॅक्टर घेऊन. यामुळे बहुतांश शेतकरी भाड्या-भुसाऱ्याने शेती कसत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येते. पण शेतीची आंतरमशागत करण्यासाठी बैलांची आवश्यकता भासते. आता बैलांच्या किमती लाखात पोहोचल्याने आणि बैलांचा सांभाळ करण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने शेतीच्या मशागतीसाठी बैल खरेदी करण्यापेक्षा ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. दिवसेंदिवस शेती करणे आता कठीण होत आहे. खते, बियाणे, औषधी यांचा खर्च गगनाला भिडला असतानाच शेतीवर नफा मिळणे कठीण झाले आहे. यातच सालगड्याचे भाव एका वर्षासाठी दीड लाखांच्या घरात पोहोचले आहेत. एवढे पैसे देऊनही जनावरांचे संगोपन करायला मजूर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले. यातच आता गेल्या काही वर्षात बैलांच्या किमती भडकल्या आहेत. सर्वसाधारण बैलजोडी दीड ते दोन लाख रुपये किमतीच्या घरात पोहोचली आहे.
लागवड कमी झाल्याने कडब्याचा भावही कडाडला२५ वर्षांपूर्वी ज्वारी, तुरीचे कुटार व कडबा हे पाळीव जनावरांचे मुख्य खाद्य होते. पण काळाच्या ओघात ज्वारीचे उत्पादन पडद्याआड झाले. आता तर अंत्यविधीसाठीही कडबा मिळणे कठीण आहे. लागवडीअभावीच कडब्याचे भाव कडाडले आहेत.
पेंडीप्रमाणे विक्री...जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात ज्वारीचे उत्पादन घेतले जात नाही. परिणामी कडबा हद्दपार झाला असून मक्याच्या पेंडीला मागणी वाढली आहे. सध्या १० रुपये प्रतिपेंडी भाव आहे.
खुट्याला जनावर नाही राहिले; बाजार फुल्ल व्हायला लागलेजिल्ह्यात देवळी येथील बैलबाजार विदर्भात प्रसिद्ध आहेत. येथे राज्यातूनच नव्हे तर परप्रांतातून बैलांची खरेदी-विक्री करण्यासाठी व्यापारी येतात. आता चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्याने जनावरे सांभाळणे कठीण झाले. विकण्याशिवाय पर्याय नाही. यामुळे शेतकऱ्यांचे खुटे मोकळे होत आहेत व बाजार फुल्ल होत आहे.
बैलजोडी नको; त्यापेक्षा जुना ट्रॅक्टर परवडलाबैलांच्या किमती भडकल्याने व संगोपणाला परवडत नसल्याने शेतकऱ्यांचा ओढा ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे. यातच शेतकऱ्यांना ट्रॅक्टर व यंत्र खरेदीसाठी शासनाच्यावतीने अनुदान दिले जात आहे.
आता तर गहू, तूर, हरभऱ्याचे कुटारही मिळेनात...अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाने अधिक प्रगती केली आहे. शेती व्यवसायात सुद्धा यंत्रांचा वापर अधिक प्रमाणात वाढला. गहू, तूर, सोयाबीन आदी पिकांची मळणी हार्वेस्टरद्वारे केल्यामुळे कुटार जनावरांच्या खाण्यायोग्य राहत नाही. परिणामी कुटार मिळणे कठीण झाले आहे.
दुभते जनावर खरेदीकडे वाढलाय ओढातसे पाहता दुभत्या जनावरांचे संगोपन करणे फार अवघडच आहे. चाऱ्याच्या दरात आणि दुधाच्या दरात कमालीची तफावत आहे. पण शेणखत व दूध मिळत असल्याने दुभत्या जनावरांना मागणी आहे.
बैल घेणे अन् सांभाळणे परवडेना"दीड ते दोन लाख रुपये खर्च करून बैल खरेदी करणे अवघड बनले आहे. इच्छा असूनही बैलजोडी खरेदी करू शकत नाही आणि शेती कमी असल्याने ट्रॅक्टरही झेपत नाही. यामुळे सध्या शेती भाड्या-भुसाऱ्याने कसणे सुरू आहेत."- विजय बेलसरे शेतकरी, जामनी
"मशागतीसाठी बैलजोडी सांभाळणे आता परवडत नाही. यासाठी मोठा खर्च येतो. सालदार मिळत नाही. किमती खूप वाढल्या आहेत. असे असले तरी बैलजोडीशिवाय शेती करणे शक्य नाही."- गजानन घोडे, शेतकरी चिकणी.