रेती घाटावरील कारवायांनी माफियांचे धाबे दणाणले
By Admin | Updated: December 18, 2014 02:05 IST2014-12-18T02:05:08+5:302014-12-18T02:05:08+5:30
तालुक्यातील १० रेतीघाटांमधून गेल्या दीड महिन्यांपासून रेतीचा अवैध उपसा सुरू होता. चोरट्यांनी रात्रीला रेतीची वाहतूक करण्याचा सपाटा लावल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता.

रेती घाटावरील कारवायांनी माफियांचे धाबे दणाणले
आष्टी (श): तालुक्यातील १० रेतीघाटांमधून गेल्या दीड महिन्यांपासून रेतीचा अवैध उपसा सुरू होता. चोरट्यांनी रात्रीला रेतीची वाहतूक करण्याचा सपाटा लावल्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने अवैध रेतीच्या उपशावर वृत्त प्रकाशित करताच तहसीलदारांनी धडक कारवाईची मोहीम सुरू केली.
रेती चोरी पकडण्यासाठी तहसीलदार एस. एस. पाटील, अतिरिक्त तहसीलदार आर. एस. हिरणवार यांनी तीन भरारी पथक तयार केले. यामध्ये नायब तहसीलदार मृदुलता मोरे, व्ही. पी. हूड, राजेंद्र देशमुख यांच्या अधिनस्थ असलेले मंडळ अधिकारी, तलाठी रेती घाटावर जाऊन ट्रक, ट्रॅक्टर पकडून बाजारभावाच्या तिप्पट रकमेचा दंड देऊन चालानद्वारे शासनाला भरण्यास भाग पाडत आहे. खंबित, अंतोरा, भारसवाडा, टेकोडा, गोदावरी या पाच घाटांमधून आतापर्यंत ३२ ट्रॅक्टर, १४ ट्रक पकडण्यात आले. त्यांच्याकडून आतापर्यंत अडीच लाख रुपये दंडापोटी वसूल करण्यात आले.
३० सप्टेंबर रोजी रेतीघाटाची मुदत संपली होती. १ आॅक्टोबरपासून रेतीच्या चोरीसाठी चोरट्यांनी विविध मार्गांचा अवलंब केला. यामध्ये चोरीची रेती जमा करून ठेवायची आणि लिलावद्वारे रॉयल्टी घेऊन विकायची, या मिळालेल्या रॉयल्टीवर रेतीघाटावरून आणखी रेती चोरून परत ठिय्यावर गोळा करायची असा गोरखधंदा चोरट्यांनी अवलंबिला होता. मात्र भरारी पथकाच्या धास्तीमुले चोरट्यांचे मनसुबे पूर्णत्वास गेले नाही.
सद्यस्थितीमध्ये तालुक्यातील एकाही रेतीघाटाचा लिलाव झाला नाही. तरीसुद्धा बांधकामावर रेतीचे ठिय्ये ठिकठिकाणी दिसत आहे. या ठिय्याला पकडण्याचे आव्हान महसूल यंत्रणेसमोर आहे. रेतीचोरी हा दंडात्मक कारवाईचा मार्ग असला तरी फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र प्रशासन कायद्याच्या पळवाटा शोधून रेतीचोरट्यांना एकप्रकार अभयच देत असल्याचा आरोप रेतीघाटामुळे त्रस्त असलेल्या गावातील नागरिकांनी केला आहे. तहसीलदार एस. एस. पाटील यांनी चोरीची रेती दिसल्यास तात्काळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे. तालुक्यात एका अधिकाऱ्याने रेतीचोरांना अभय दिल्याचा आरोप होत आहे. सदर अधिकारी सुटीच्या दिवशी चोरट्यांशी अर्थपूर्ण व्यवहार साधण्यासाठी गुप्त बैठक घेतात. याप्रकरणी तहसीलदारांना माहिती देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)