गॅस एजन्सीद्वारे ग्राहकांची लूट
By Admin | Updated: July 9, 2016 02:17 IST2016-07-09T02:17:18+5:302016-07-09T02:17:18+5:30
वैष्णवी गॅस एजन्सीद्वारे ग्राहकांकडून अतिरिक्त पैशाची वसुली केली जात असल्याचा आरोप करीत यासंदर्भात नागरिकांनी वारंवार संबधित विभागाकडे तक्रारी केल्या.

गॅस एजन्सीद्वारे ग्राहकांची लूट
कार्यवाहीची मागणी : ग्राहकांची थेट पेट्रोलियम मंत्र्यांनाच तक्रार
गिरड : वैष्णवी गॅस एजन्सीद्वारे ग्राहकांकडून अतिरिक्त पैशाची वसुली केली जात असल्याचा आरोप करीत यासंदर्भात नागरिकांनी वारंवार संबधित विभागाकडे तक्रारी केल्या. या तक्रारींची दखल घेत वैष्णवी गॅस एजन्सीवर कारवाई होत नसल्याने नागरिकांनी थेट केंद्रीय पेट्रालिअम मत्र्यांकडेच याबाबत तक्रार दाखल केली. पंतप्रधान कार्यालयालाही याबाबत निवेदन सादर केले असल्याने यावर होणाऱ्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वैष्णवी गॅस एजन्सीने २००५ ते १६ या १२ वर्षांत ७० हजार सिलिंडरची विक्री केली आहे. प्रति सिलिंडर १०० ते १५० रुपये ग्राहकाकडून अतिरिक्त घेत तब्बल ८० लाख रुपयाची लूट केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे सदर अतिरिक्त वसुली ग्राहकांना परत करावी, अशी मागणी होत आहे. शिवाय शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच ग्राहकांकडून पैसै घ्यावे आणि पावती द्यावी अशी मागणीही करण्यात आली आहे. गिरड हे तालुक्यातील सर्वाधित लोकसंख्येचे गाव आहे. ३० गावे या गावाला लागून आहे. त्यामुळे येथे आणखी एक नवीन गॅस एजन्सी द्यावी अशी मागणीही या निवेदनातून केली आहे. समुद्रपूर येथील वैष्णवी गॅस एजन्सी ही ग्राहकांकडून बाजारभावापेक्षा अतिरिक्त रक्कम घेत असल्याचा आरोप करून ग्राहकांशी अरेरावी करीत असल्याचेही सदर तक्रारीत नमूद आहे.
याबाबत गिरड ग्रामपंचायतद्वारे २६ जानेवारी २०१६ घेतलेल्या ग्रामसभेत ठराव मंजूर करून वैष्णवी गॅस एजन्सीविरुद्व कारवाईची मागणी केली होती. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी वैष्णवी गॅस एजन्सीच्या वितरकाला नोटीसही बजावली होती. पण वितरकावर याचा काहीही परिणाम झाला नाही़ शिवाय ग्राहकाकडून अतिरिक्त रक्कम वसुली सुरूच असल्याचा आरोप निवेदनात केला आहे़ दुसऱ्यांदा ग्रामसभेत ठराव मंजूर करून नागपूर विभागीय इंडियन पेट्रोलिअम कार्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे कारवाईसंदर्भात विचारणा केली असता काहीच उत्तर मिळाले नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या संगममताने ग्राहकांची लुट सुरू असल्याचा आरोप करीत सदर तक्रार पेट्रोलिअम मंत्रालयाकडे करण्यात आली आहे. शिष्टमंडळात
राजेश चामचोर, अजय इंदुरकर, प्रभाकर चामचोर, अनिल गौरकर, अनुप तुपे, प्रभाकर पाणबुडे, प्रभाकर डंभारे, कल्पना लोढे, रामेश्वर बावणे, श्याम रीठेकर यांच्यासह शेकडो ग्राहकांचा सहभाग होता. (वार्ताहर)
आतापर्यंतच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
गावातल सिलिंडर धारकांना लुटणाऱ्या या गॅस एजन्सी विरोधात ग्रामस्थांनी संबधित विभागाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र संबधित विभागाकडून या प्रकरणी कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व गॅस एजन्सी मालकांत आर्थिक देवाण घेवाण झाल्याचा आरोप तक्रार कर्त्यांकडून करण्यात आला असून कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.