Lockdown to the Maroti shrine | मारोती देवस्थानाला लॉकडाऊन

मारोती देवस्थानाला लॉकडाऊन

ठळक मुद्देकोरोनामुक्तीचा लढा : हनुमंताचरणी भक्तांनी केली प्रार्थना, उत्सवाला बगल देत साध्यापणाने पूजाअर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना या संसर्गजन्य आजाराच्या प्रादुर्भावामुळे सर्व देवस्थान व मंदिरेही बंद करण्यात आले आहे.आज सकटमोचन श्री हनुमान जयंती असल्याने जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिर लॉकडाऊन असतानाही भाविकांनी साध्यापद्धतीने पूजाअर्चा करुन देशावरील कोरोनाचे संटक दूर करण्याची प्रार्थना केली आहे.
वर्धा तालुक्यातील वायफड या गावालगतच्या निंबा (बोडखा) येथील हनुमंत देवस्थान गावातीलच नाही तर पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या दीडशे वर्षापासून या देवस्थानात हनुमान जयंतीचा उत्सव भक्तीभावाने साजरा करण्यात येतो. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे सर्वत्र देऊळबंद असल्याने याचा परिणाम या हनुमान जयंती उत्सवावर पडला आहे. देवस्थान समितीने प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत कोरानाचा संसर्ग रोखण्यासाठी हनुमान जयंती उत्सव रद्द केला. त्यामुळे आज हनुमान जयंतीदिनी अत्यंत साध्यापद्धतीने हनुमानजीच्या मूर्तीची पूजाअर्जा केली.
अशी माहिती देवस्थानचे पदाधिकारी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शशांक घोरमाडे यांनी दिली. बुधवारी पहाटे हनुमंताच्या मूतीचे मंगलस्नान, अभिषेक, वस्त्रअर्पण करण्यात आले. त्यानंतर मूर्ती सजावट व शेंदूर लेपणाचा कार्यक्रम पार पडला. विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर आरती करण्यात आली. शशांक घोरमाडे व त्यांचे बंधू शैलेश घोरमाडे यांच्या हस्ते पूजाविधी पार पडला. त्यानंतर कोरोना आजारापासून देशाला मुक्त करा, सर्वांची रक्षा करा, अशी प्रार्थना हनुमंता चरणी करण्यात आली.

चिकणीत प्रसादाचे घरापोच वितरण
चिकणी येथील हनुमान मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहाने हनुमान जयंती साजरी करण्यात येते होती. पण, यावर्षी कोरोना विषाणू मुळे भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले. आत्तापर्यंतच्या कालखंडातील ही पहिलीच वेळ असल्याचे वयोवृद्ध सांगतात. आज दोघातिघांनीच सामाजिक अंतर ठेऊन पूजा, आरती केली. त्यानंतर प्रसादाचे घरपोच वितरण केले.

वरूड (रे.) येथील शंभर वर्षांच्या परंपरेला लागला बे्रक
सेवाग्राम : नजीकच्या वरूड (रे.) येथे पंचक्रोशीतील प्रसिद्ध मारोती महाराज देवस्थान आहे. या मंदिरात हनुमान जयंतीचा ऊत्सव तीन दिवस चालत असतो. पण, कोरोना व्हायरस आणि जमावबंदी असल्याने देवस्थान कमेटीनी शंभर वर्षाची पंरपरा असतानाही सकाळी अत्यंत साध्या पध्दतीने घटस्थापना, पूजा आणि आरती करून प्रसाद वितरण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. प्रसाद देशमुख, जगदीश अंबुलकर, प्रल्हाद देऊळकर, देविदास जामुनकर यांची उपस्थिती होती. सर्व भाविकांनाी मंदिराच्या बाहेरूनच पूजा केली. यात सोशल डिस्टंन्सिंगचा अवलंब करण्यात आला. या मंदिरात दरवर्षी तीन दिवसाचा उत्सव असतो. यात दोन दिवस भाविकांना जेवन असते.तिसऱ्या दिवसी मिरवणूक, दहिहंडी आणि भजन मंडळींना मानपान व प्रसाद वितरण केल्या जाते. असा भव्य कार्यक्रम गावात साजरा होत असल्याने आजूबाजूच्या परिसरातील भाविक मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेत असतात. मात्र, यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे देवस्थान समितीने प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन सर्व कार्यक्रम रद्द करीत साध्या पद्धतीने पूजाअर्जा करुन हनुमान जयंती उत्सव साजरा केला.


आर्वीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत भक्तांनी घेतले हनुमंताचे दर्शन
आर्वी तालुक्यात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. प्रत्येक गावात वेशीवर हनुमान मंदिर आहे परंतु, यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या लॉकडाऊनमुळे हनुमान जयंतीच्या उत्सवावर पाणी फेरले गेले. आर्वी शहरातच नाही तर तालुक्यातील प्रत्येक हनुमान मंदिरात साध्यारितीने पूजा, आरती करण्यात आली. भाविकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन हनुमंताचे दर्शन घेतले. येथील कोणत्याही परिसरातील हनुमान मंदिराची यावर्षी रंगरंगोटी केली नाही. तसेच विद्युत रोषणाई न करता साध्या पद्धतीने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. घरीच प्रसाद तयार करुन मंदिरातील हनुमानजीला नैवद्य दाखविण्यात आला. देवस्थानांनी महाप्रसाद व इतर कार्यक्रमही रद्द केलेत.

Web Title: Lockdown to the Maroti shrine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.