जनार्धनच्या अवयवदानामुळे चौघांना जीवनदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:17 IST2018-02-19T22:16:49+5:302018-02-19T22:17:05+5:30
तालुक्यातील किन्हाळा येथील शेतकरी जनार्धन बोबडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी जनार्धन यांचे अवयवदान केल्याने चौघांना जीवनदान मिळाले आहे.

जनार्धनच्या अवयवदानामुळे चौघांना जीवनदान
आॅनलाईन लोकमत
समुद्रपूर : तालुक्यातील किन्हाळा येथील शेतकरी जनार्धन बोबडे यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी शेतकरी जनार्धन यांचे अवयवदान केल्याने चौघांना जीवनदान मिळाले आहे.
जनार्धन यांनी संपूर्ण आयुष्य काळ्या आईच्या सेवेत अर्पण केले होते. पारंपारिक शेती करताकरताच आपले मरण आहे, हे त्यांना माहिती झाले होते. त्यांनी मध्यंतरीच्या काळात भाजीपाला शेती केली. वेळेप्रसंगी छोटा मोठा व्यवसायही त्यांनी केला. मागील काही वर्षामध्ये भाजीपाल्याच्या शेतीतून त्यांना चार पैसे मिळायला लागले होते. दरम्यान त्यांचा अपघाती मृत्यू झाला. बोबडे कुटुंबियानी त्यांचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतल्याने चौघांना जीवदान मिळाले.
१४ फेब्रुवारीला शेतकरी जनार्धन हे दुचाकीने शेतातील भाजीपाला घेऊन हिंगणघाटच्या बाजारात गेले होते. परतीच्या प्रवासादरम्यान त्यांचा अपघात झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा बे्रन डेड झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या दु:खाच्या प्रसंगी मोठ्या हिमतीने जनार्धनचा मुलगा योगेश व बोबडे कुटुंबियानी जनार्धन यांच्या अवयवदानाचा निर्णय घेतला.
हिंगणघाट येथील पर्व फाउंडेशनच्या मदतीने शनिवारी नागपूर येथून ग्रीन कॉरीडॉरमधून जनार्धन बोबडे यांचे अवयव गरजूंपर्यंत पोहचविण्यात आले. जनार्धन बोबडे यांचे हृदय आजपर्यंत केवळ शेतीच्या मशागतीसाठी धडधडले. हृदयदान केल्यामुळे त्यांचे हृदय आता चेन्नईला धडकणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांचे हृदय चेन्नई येथील एका रुग्णाला देण्यात आल्याने त्या रुग्णाला जीवनदान मिळाले आहे. तर यकृत औरंगाबाद येथे नेण्यात आले. एक मुत्रपिंड नागपूर येथील व्होकार्टमधील रुग्णाला देण्यात आले आहे. अशाप्रकारे एका शेतकºयाच्या अवयवदानामुळे चार जणांना जीवनदान मिळाले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.