वीज तारांवर कोसळले झाड; पुरवठा खंडित

By Admin | Updated: July 20, 2015 02:09 IST2015-07-20T02:09:45+5:302015-07-20T02:09:45+5:30

गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वच त्रस्त आहेत. रविवारी सकाळपासून पावसाचे वातावरण होते.

Lightning damaged trees; Break the supply | वीज तारांवर कोसळले झाड; पुरवठा खंडित

वीज तारांवर कोसळले झाड; पुरवठा खंडित

अपघात बचावला : विश्रामगृह परिसरातील घटना
पुलगाव : गत २५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सर्वच त्रस्त आहेत. रविवारी सकाळपासून पावसाचे वातावरण होते. यामुळे पावसाचे आगमन होणार, अशी अपेक्षा होती; पण सकाळी ११ वाजताच्या सुमारास सोसाट्याचा वारा सुरू झाला. या वादळी वाऱ्यामुळे विश्रामगृहाच्या हद्दीतील झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर पडल्या. यात वीज तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. दरम्यान, नागरिकांनी प्रसंगावधान राखल्याने अपघात टळला.
जुलै महिना अर्धा उलटला असताना पावसाचे आगमन झाले नाही. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले असून वातावरणातही बदल झाले आहेत. परिणामी, अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. यामुळे सर्वच पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. दररोज पावसाचे ढग दाटतात; पण पाऊस हुलकावणी देतो. रविवारीही पावसाचे ढग दाटून आले. सोसाट्याच्या वाऱ्याला सुरूवात झाली. आता पाऊस येईल, अशी अपेक्षा असतानाच पाऊस मात्र आलाच नाही. दरम्यान, शहरातील विश्रामगृहाच्या हद्दीत असलेल्या एका झाडाच्या मोठ्या फांद्या वीज तारांवर कोसळल्या. यामुळे विजेच्या तारा तुटून जमिनीवर लोंबकळत होत्या. रस्त्याच्या कडेलाच तुटलेल्या या तारांमुळे काही काळ रहदारी धोक्यात आली होती. गोदामाकडे जाणाऱ्या रस्त्यावरच हे झाड कोसळून तारा तुटल्याने तेथून ये-जा करणारे नागरिक थोडक्यात बचावले. शहरातील मुख्य मार्गावर तुटलेला विद्युत तार लोंबकळत होता. यामुळे रहदारी धोक्यात आली आहे.
वीज तारा तुटल्याबाबत परिसरातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीला सूचना दिली. यावरून वीज कंपनीद्वारे त्वरित वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यानंतर कर्मचाऱ्यांनी दुपारी घटनास्थळ गाठून दुरूस्तीच्या कामास सुरूवात करण्यात आली. अकस्मात तुटलेल्या या तारांमुळे चिमुकल्यांना घेऊन घरी जात असलेला एक युवक थोडक्यात बचावला. मुख्य रस्त्यावर विद्युत तार लोंबकळत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला. विद्युत वितरण कंपनीने याकडे लक्ष देत विद्युत तारांची त्वरित दुरूस्ती करणे गरजेचे आहे.(शहर प्रतिनिधी)

पावसाळ्यापूर्वीच्या कामांकडे दुर्लक्षामुळे तुटतात तारा
पावसाळ्यापूर्वी वीज वितरण कंपनीला दुरूस्तीची कामे हाती घ्यावी लागतात. यात सर्विस केबल, जुनाट वीज तारा, वीज खांबांवरील वीज अवरोधक आदी बदलणे गरजेचे असते; पण या कामांकडे दुर्लक्ष केले जाते. शिवाय वीज तारांवर लोंबकळणाऱ्या झाडांच्या फांद्याही कापल्या जात नाहीत. यामुळे पावसाळ्यात झाडे कोसळून वीज तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडतात. शहरातील विश्रामगृहातील वीज तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्याही कापण्यात आल्या नव्हत्या. यामुळेच रविवारी सकाळी वादळी वाऱ्यामुळे फांद्या तुटून वीज तारांवर पडल्या. यात तारा तुटल्या. यापूर्वीही शहरात झाडांच्या फांद्या पडल्यामुळे वीज तारा तुटण्याच्या घटना घडल्या आहेत; पण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसते.

विजेचा खेळखंडोबा

शहरात ६६ केव्हीचे पावरस्टेशन आहे; पण सर्वाधिक विजेचा खेळखंडोबा शहरातच होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळपासून अनेकदा वीज पुरवठा खंडित होतो. यामुळे व्यवसायांवरही संक्रांत आली आहे. याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: Lightning damaged trees; Break the supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.