१०० रुग्णांना जीवनदायीचा लाभ
By Admin | Updated: August 14, 2014 00:01 IST2014-08-14T00:01:10+5:302014-08-14T00:01:10+5:30
गोरगरीब कुटुंबांसह सामान्यांनाही महागडे औषधोपचार घेता यावेत यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्नशील आहे़ यासाठी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचा उशीराने

१०० रुग्णांना जीवनदायीचा लाभ
सामान्य रुग्णालयाची माहिती : रूग्णसेवा झाली सुरळीत
वर्धा : गोरगरीब कुटुंबांसह सामान्यांनाही महागडे औषधोपचार घेता यावेत यासाठी आरोग्य प्रशासन प्रयत्नशील आहे़ यासाठी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली़ या योजनेचा उशीराने का होईना जिल्हा सामान्य रुग्णालयानेही लाभ घेतला आहे़ गत आठ महिन्यांमध्ये सामान्य रुग्णालयातील सुमारे १०० रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ देण्यात आला आहे़ यात रुग्णालयाला १० लाख रुपये प्राप्त झाले आहेत़
शासकीय रुग्णालयांमध्ये ग्रामीण भागातील रुग्णांची मोठी गर्दी असते़ मोफत आरोग्य सेवा मिळत असल्याने ग्रामीण नागरिक जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील उपचारांना प्राधान्य देतात़ खासगी महागड्या सेवेचा लाभ न घेता शासकीय यंत्रणेही ग्रामीण रुग्ण विश्वास ठेवतो़ यामुळे शासनानेही गोरगरीब, गरजू व सामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्यसेवा मिळाव्या म्हणून प्रयत्न चालविले आहेत़ राज्य शासनाच्या आरोग्य प्रशासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या जीवनदायी योजनेचाही सध्या सामान्यांना बराच लाभ होत आहे़ वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात १ जानेवारी ते १५ आॅगस्ट २०१४ या आठ महिन्यांच्या कालावधीत १०० रुग्णांना जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ देण्यात आला आहे़ यात कुणाच्या शस्त्रक्रिया तर कुणाचे महागडे उपचार पार पाडण्यात आले आहेत़ या योजनेखाली रुग्णालयात शासनाकडून १० लाख रुपयांचे अनुदानही प्राप्त झाले आहे़
सध्या सामान्य रुग्णालयातील रुग्णसेवेत सुधारणा झाल्याचे दिसून येते़ कित्येक वर्षांपासून तंत्रज्ञ मिळत नसल्याने बंद असलेल्या डायलेसिस, सिटी स्कॅन, सोनोग्राफी आदी सुविधाही सुरू करण्यात आल्या आहेत़ यामुळे सामान्यांना दिलासा मिळाला आहे़ चार महिन्यांमध्ये डायलेसिस या सुविधेचा ७५० रुग्णांना लाभ देण्यात आलेला आहे़ यातील १४ रुग्णांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ रुग्णालयाद्वारे मिळवून देण्यात आलेला आहे़ कित्येक वर्षे बंद असलेल्या सिटी स्कॅन या सुविधेचा सुमारे २ हजार ५०० ते ३ हजार रुग्णांना लाभ देण्यात आला आहे़ वेळीच सिटी स्कॅनची सुविधा प्राप्त झाल्याने अनेक रुग्णांना जीवनदानही मिळाले आहे़
सुकन्या योजनेलाही जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रतिसाद मिळत आहे़ या योजनेंतर्गत दररोज सामान्य रुग्णालयात आठ ते दहा प्रसूत्या केल्या जात असल्याची माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी राठोड यांनी आरटीआय कार्यकर्ते ताराचंद चौबे यांना दिले़ सोनोग्राफी करण्याकरिता खासगी डॉक्टर ६०० ते १००० रुपये घेतात; पण सामान्य रुग्णालयात ही सुविधा केवळ १०० रुपयांत उपलब्ध होत असल्याने ग्रामीण रुग्णांची मोठी सोय झाली आहे़ कित्येक वर्षांपासून मृतप्राय ठरलेल्या सुविधा पुर्ववत सुरू झाल्याने सामान्य रुग्णालयात ग्रामीण तसेच शहरातीलही सामान्य कुटुंबातील रुग्णांची गर्दी वाढल्याचे दिसून येत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)