७९ वर्षांत दीड कोटींच्या वर विद्यार्थ्यांना दिले हिंदीचे धडे
By Admin | Updated: July 4, 2015 00:18 IST2015-07-04T00:18:38+5:302015-07-04T00:18:38+5:30
वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समिती स्थापन करण्याचा विचार सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडला होता.

७९ वर्षांत दीड कोटींच्या वर विद्यार्थ्यांना दिले हिंदीचे धडे
दिनविशेष : राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या माध्यमातून
हिंदीची लवचिकता तिला सहज बनविते
श्रेया केने वर्धा
वर्धा येथे राष्ट्रभाषा प्रचार समिती स्थापन करण्याचा विचार सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी मांडला होता. ४ जुलै १९३६ पासून कार्यरत या संस्थेच्या माध्यमातून देशविदेशात हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसाराचे कार्य सुरू आहे. या ७९ वर्षांच्या काळात आजवर १ कोटी ६६ लाखाहून अधिक हिंदीतेतर लोकापर्यंत या प्रचार समितीच्या माध्यमातून हिंदी भाषा पोहचवली आहे.
भारतातील पूर्वोत्तर राज्यांना देशासोबत जोडण्यासाठी राष्ट्रभाषा प्रचार समितीचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. या राज्यात हिंदी भाषेचा प्रचार करून तेथील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे. सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापन केल्यानंतर सैन्यभरती दरम्यान तेथील लोकांचा प्रथमच हिंदीशी परिचय झाला. भारतातील हिंदीतर राज्यात हिंदीचा प्रचार करण्यासाठी गांधीजींनी घेतलेल्या सभेला सुभाषचंद्र बोस उपस्थित होते. या माध्यमातून या सात राज्यात हिंदीचा प्रसार झाला. नागालँड राज्याने हिंदी भाषा अभ्यासक्रमात अनिवार्य केली आहे. वर्धा येथे पूर्वोत्तर राज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.
प्रादेशिक भाषेची अस्मिता जपताना हिंदीचा प्रचार करण्याचे आव्हान संस्थेकडून लीलया पेलण्यात येत आहे. भारतात किंवा भारताबाहेर जेव्हा दोन भिन्न प्रांतातील आणि भिन्न प्रादेशिक भाषा बोलणारे व्यक्ती एकत्रित येतात तेव्हा त्यांच्यातील संपर्क भाषा हिंदी असायला हवी, यासाठी संस्था प्रयत्नरत असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी यांनी दिली. हिंदी ही राजभाषा असून संविधानाने तिचा स्विकार केला आहे. तरीही या भाषेला विरोध होतो. हिंदीप्रती आपुलकी निर्माण व्हावी, जनसामान्यांनी तिचा स्वीकार करावा, या भाषा प्रचार तंत्राचा वापर करून त्याची अंमलबजावणी करण्याचा कटाक्ष असतो. हिंदीच्या प्रचाराकरिता समितीच्यावतीने सतत कार्य सुरू आहे. आता त्याच्या मदतीला वर्धेत हिंदी विद्यापीठ आले आहे. त्याचाही लाभ होत आहे.
हिंदी भाषा ही सहज, सोपी व बोधगम्य आहे. या विशेषतेमुळेच हिंदी भिन्न संस्कृतीतील व्यक्तींना जोडते. हिंदीची लवचिकता तिला सहज स्वीकार्ह बनविते. भारतात विविध भाषा आणि संस्कृतीचे लोक वास्तव्य करतात. यात एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी भावात्मक एकता आवश्यक आहे. हिंदी भाषा यात महत्त्वाची भूमिका पार पाडते, असे मत राष्ट्रभाषा प्रचार समितीचे प्रधानमंत्री प्रा. त्रिपाठी यांनी व्यक्त केले.
हिंदी भाषेची एक वेगळी क्षमता आहे. हिंदी क्रियापदाचा वाक्यात उपयोग केल्यास ते वाक्य हिंदी भाषेतील ठरते. विविध २१ देशात हिंदी प्रचार समितीचे कार्य आहे. दरवर्षी ३ लाख विद्यार्थी हिंदी भाषा परीक्षा देतात.
४ जुलै १९३६ रोजी स्थापित या समितीचे पहिले अध्यक्ष भारतीय गणराज्याचे प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद होते. देश पारतंत्रात असतानाही त्यांनी हिंदी प्रचार कार्याला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले. भाषेचा प्रचार करताना ती स्वीकार्ह असावी, तिची सक्ती होऊ नये याकरिता डॉ. राजेंद्र प्रसाद आग्रही होते. या मूल्यांची देण त्यांच्याकडून संस्थेला मिळाली. त्याची आजही अंमलबजावणी करण्याचा कटाक्ष असतो.
हिंदी भाषा प्रचार हाच या संस्थेचा प्रमुख उद्देश आहे. याला नवतंत्रज्ञानाची जोड देऊन प्रचारचे माध्यम अधिक प्रभावी करण्याचा प्रयत्न राहील. हिंदी भाषेतून रोजगार निर्मितीला वाव आहे.
-प्रा. अनंतराम त्रिपाठी
प्रधानमंत्री, राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा