सव्वालाख विद्यार्थ्यांचे ‘लर्न फॉर्म होम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 05:00 IST2020-04-23T05:00:00+5:302020-04-23T05:00:22+5:30

इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध विषयांच्या जवळपास १८६ प्रश्नपत्रिका या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याला १ लाख ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या असून १ लाख २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत. आठही तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अध्यापन सुरु आहे.

Learn form home for millions of students | सव्वालाख विद्यार्थ्यांचे ‘लर्न फॉर्म होम’

सव्वालाख विद्यार्थ्यांचे ‘लर्न फॉर्म होम’

ठळक मुद्देविद्यार्थ्यांसह पालकांचाही प्रतिसाद : पावणेदोन लाख विद्यार्थ्यांची संकेतस्थळाला भेट

आनंद इंगोले।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अभ्यासातील सातत्य कायम राहावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ‘लर्न फॉर्म होम’ हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाला जिल्हा परिषदसह खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांच्या कालावधीत तब्बल १ लाख २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी आॅनलाईन प्रश्न पत्रिका सोडवून ‘लर्न फॉर्म होम’ या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.
राज्यभरातील शाळा आता नव्या आदेशानुसार ३ मे पर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील सातत्य कायम राहावे, यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फार्म होम’ ही संकल्पना मांडली. त्यानुसार जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्या सूचनेनुसार शिक्षण विभागामार्फत ‘लर्न फॉर्म होम’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले स्टडी मटेरियल  संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या विविध विषयांच्या जवळपास १८६ प्रश्नपत्रिका या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. याला १ लाख ७५ हजार ७६० विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या असून १ लाख २५ हजार ६३८ विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिका सोडविल्या आहेत. आठही तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीतही विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अध्यापन सुरु आहे.
याकरिता सर्व गटविकास अधिकारी, केंद्र प्रमुख, मु्ख्यध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पालक यांचेही चांगले सहकार्य मिळत आहे.

जिल्ह्याबाहेरील अडीच हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. विध्यार्थी स्वत:च्या घरी बसून अभ्यास करावा, याकरिता शैक्षणिक हित जोपासत शिक्षण विभागाकडून ‘लर्न फॉर्म होम’ हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला. पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व विषयांच्या सारख्या प्रश्नपत्रिका ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहे. याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रात पहिल्यांदा जिल्हास्तरावरून विशेष कृती गट स्थापन करण्यात आले.
या ऑनलाईन उपक्रमामध्ये दररोज किती विद्यार्थी व शिक्षक सहभागी होतात हेही दिसत आहे. त्यामुळे विद्यार्थी किंवा पालकांना काही अडचणी आल्यास ते शिक्षकांना विचारतात. शिक्षकही त्यांच्याशी संपर्क साधून त्यांचे निराकरण करीत आहे. यामध्ये विषयानुसार प्रश्नपत्रिकेसह सामान्य ज्ञान, स्वयंअध्ययन व इतर उपक्रमही दिलेले असल्याने विद्यार्थींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.परिणामी जिल्ह्याबाहेरीलही जवळपास दोन ते अडीच विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

लॉकडाऊनच्या कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच शिक्षणातील सातत्य कायम राहावे म्हणून ‘लर्न फॉर्म होम’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. याला विद्यार्थी व पालकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून विद्यार्थी व पालकांना असलेल्या अडचणींचे शिक्षकांकडून निराकरणही केले जात आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांकरिता नीट व सीईटी परीक्षेच्या दृष्टीकोनातूनही विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिला जाईल.
- उल्हास नरड, शिक्षणाधिकारी, (माध्य.) वर्धा.

Web Title: Learn form home for millions of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.