महामार्गाच्या कामापूर्वीच शेतकऱ्यांना भूखंड
By Admin | Updated: October 4, 2016 01:51 IST2016-10-04T01:51:19+5:302016-10-04T01:51:19+5:30
महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रासाठी मिळालेल्या जमिनीचे ले-आऊट तयार करून लॉटरी पद्धतीने

महामार्गाच्या कामापूर्वीच शेतकऱ्यांना भूखंड
राधेश्याम मोपलवार : महामार्गामुळे एक लाख रोजगाराची संधी
वर्धा : महाराष्ट्र समृद्धी महामार्गालगत उभारण्यात येणाऱ्या कृषी समृद्धी केंद्रासाठी मिळालेल्या जमिनीचे ले-आऊट तयार करून लॉटरी पद्धतीने भूसंचयन करणाऱ्या शेतकऱ्यांना तेथील भूखंडाचे हक्क दिल्यानंतरच महामार्गाच्या कामाला प्रारंभ करण्यात येईल. महामार्गाचे काम आणि कृषी समृद्धी केंद्रातील मुलभूत सुविधांची कामे सोबत-सोबत करण्यात येतील. त्यामुळे रस्ता तयार होईपर्यंत कृषी समृद्धी केंद्र उद्योग येण्यासाठी पूर्णपणे तयार झाले असेल, अशी माहिती महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.
नागपूर-मुंबई द्रुतगती मार्गासंबंधी कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी मोपलवार बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपविभागीय अधिकारी जी.एच. भूगावकर, प्रकाश शर्मा, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे यु.व्ही.डाबे, भूसंपादन अधिकारी सुके, तहसीलदार व तलाठी उपस्थित होेते.
पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर ते थेट मुंबई-गुजरात पर्यंत जलद प्रवासाठी सहा पदरी महामार्ग आहेत. पुणे-मुंबई तसेच नाशिक-मुंबई रस्ते सुद्धा महामार्ग आहेत. त्यामुळे तेथील कच्चा माल तत्काळ मुंबईला पाठविण्यात येतो. तसेच तेथील उद्योगांनाही यामुळे जलद माल पाठविता येतो. पण विदर्भातील आत्महत्याग्रस्त सहा जिल्ह्यामध्ये तत्काळ मुंबईला नाशिवंत वस्तु पाठविण्यासाठी ३६ तास लागतात.
ज्या-ज्या शहराच्या बाजूला महामार्ग आहेत तिथे रस्त्याच्या बाजुला उद्योग, व्यवसाय सुरू झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे पुढील १० वर्षात या भागात १ लाख रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पात जात नाही ते शेतकरी रस्त्याच्या बाजूला उद्योग, व्यवसाय सुरू करतात, आणि ज्यांची जमीन प्रकल्पामध्ये गेली ते उध्वस्त होतात. प्रकल्पाचा फायदा शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मिळावा म्हणून भूसंचयन संकल्पना राबविण्यात येत आहे. असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
व्यवसायाकरिता बँकांची मदत
४वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. जगाला तत्वज्ञान देणारा सर्वोत्तम जिल्हा तयार करण्यासाठी कटीबद्ध आहे. वर्धेसाठी नाट्यगृह, अत्याधुनिक बसस्थानक, देवळीला स्टेडीयम तसेच लोअर वर्धा २०१७ पर्यंत पूर्ण करून शेतकऱ्यांना सिचंनासाठी पाणी देण्याचा संकल्प आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शून्यावर आणण्याचे आवाहन या सरकारने स्वीकारले आहे, असे प्रतिपादन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.