मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा बोजवारा
By Admin | Updated: August 21, 2016 00:39 IST2016-08-21T00:39:17+5:302016-08-21T00:39:17+5:30
वर्षातील आठ महिने बेपत्ता असलेली गुरे पावसाळ्याची चार महिने रस्त्यावर दिसतात.

मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा बोजवारा
नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्यावरील जनावरांमुळे अपघाताच्या संख्येत वाढ
पुलगाव : वर्षातील आठ महिने बेपत्ता असलेली गुरे पावसाळ्याची चार महिने रस्त्यावर दिसतात. प्रत्येक वर्षी हा प्रकार घडत असल्याने पावसाळ्यातच मोकाट गुरांची समस्या का निर्माण होते, हा प्रश्नच आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिसणाऱ्या मोकाट गुरांमुळे वाहतुकीचा मात्र बोजवारा उडत आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांत असंतोष पसरला आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
शहर व परिसरातील वाढत्या लोकसंख्येसोबतच दुचाकी चारचाकी वाहनांची संख्याही वाढत आहे. पूर्वी सायकल घेऊन फिरणारी व्यक्ती मोटर सायकल, कारने फिरू लागली. युवकांची ‘रॅश ड्रायव्हींग’ वाढली आहे; पण शहरातील रस्ते वेगात वाहने चालविण्यासारखे राहिले नाहीत. खाचखळग्यांनी व्यापलेले रस्ते दुरूस्त करता येतात; पण वर्दळीच्या रस्त्यावर चौकात बसलेली जनावरे सतत वाहतुकीची कोंडी करताना दिसतात. रस्त्यातील या गतिरोधकांमुळे वाहतुकीची कोंडी होते. शहरातून नागपूर-मुंबई द्रुतगती मार्ग, हैदराबाद-भोपाळ, अहेरी-धारणी राज्यमार्ग जातात. कमी वेग आणि इंधन वापरून लवकर पल्ला गाठण्याच्या दृष्टीने या सर्व मार्गावर जड वाहने, बसेस, कार, दुचाकी आदी वाहनांची रहदारी वाढली आहे. यातच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. यामुळे या मार्गांवर वाहने चालविणे म्हणजे जीवावर बेतणारेच ठरत आहे.
शहरातून जाणाऱ्या या मार्गावरील नाचणगाव, कुर्ला वस्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, दिनदयाल चौक तर देवळीकडून येणाऱ्या मार्गावर नगर परिषद हायस्कूल, पोस्ट आॅफिस, कॉटन मील आदी ठिकाणी दिवस-रात्र डेरा टाकून बसणारी मोकाट जनावरे गतिरोधकाचे काम करतात. यामुळे भरधाव वाहन चालकास कधी-कधी वाहने नियंत्रीत करणे त्रासदायक ठरते. ही जनावरे इतकी निगरगट्ट आहेत की, वाहन जवळ येऊनही रस्त्यातून उठत नाही. शेवटी वाहन चालकालाच बाजूने वाहन काढावे लागते. अशावेळी समोरून वाहन आल्यास अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. अशीच स्थिती शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही आहे. दिर्घ काळ टिकावे म्हणून डांबरीकरण झालेल्या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्यात आले; पण या सिमेंट रस्त्यांनीही लवकरच आपले अंतरंग दाखविले. रस्त्यावर नागरिकांनी आपल्या सोयीप्रमाणे ठिकठिकणी गतिरोधक निर्माण केले.
मध्यंतरी पाणी पुरवठ्याच्या नवीन जलवाहिन्यांसाठी सिमेंट रस्ते खोदण्यात आले. यामुळेही या रस्त्यावर नाल्या तयार झाल्या. त्या नगर प्रशासनाने न बुजविल्याने पावसामुळे त्यातील माती दबून लांबलचक नालीरूपी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. नगर पालिका तसेच बांधकाम विभागाचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे. याकडे लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.(तालुका प्रतिनिधी)