कोतवाल, पोलीस पाटलांची पदे रिक्तच
By Admin | Updated: August 4, 2014 23:53 IST2014-08-04T23:53:47+5:302014-08-04T23:53:47+5:30
तालुक्यात ग्रामविकासात शासन आणि गाव यांच्यातील दुवा समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटील आणि कोतवालांच्या अनेक जागा कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. शासनाकडे मागणी

कोतवाल, पोलीस पाटलांची पदे रिक्तच
कांरजा (घा़) : तालुक्यात ग्रामविकासात शासन आणि गाव यांच्यातील दुवा समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटील आणि कोतवालांच्या अनेक जागा कित्येक वर्षांपासून रिक्त आहे. शासनाकडे मागणी केल्यानंतरही या जागा भरल्या गेल्या नसल्याने गाव पातळीवर शासकीय योजनांची माहिती पुरविणे तसेच गावांतील समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे काम थंडबस्त्यात आहे. या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्यात, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष डॉ. भक्ते व सचिव सुभाष चरडे यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी निवेदनही सादर केले आहे़
कारंजा तालुक्यात पोलीस पाटलांच्या एकूण ७७ जागा प्रस्तावित आहेत. त्यापैकी १० जागा नवीन झालेल्या तळेगाव पोलीस ठाण्यामध्ये स्थानांतरीत करण्यात आल्या आहेत़ सुमारे २५ पोलीस पाटलांच्या जागा ५ ते १० वर्षांपासून रिक्त आहेत़ अनेक मोठ्या गावांत पोलीस पाटील नियुक्त करण्यात आले नसल्यासने त्या गावच्या तक्रारी वा समस्या शासनापर्यंत पोहोचत नाहीत़ पोलीस ठाणे, तहसील कार्यालयाला आपल्या योजना गावापर्यंत पोहोचविण्यातही मोठा त्रास सहन करावा लागतो़ गावांत चालणारे अवैध व्यवसाय, भांडण तंट्यांवर नियंत्रण राहत नाही. पोलीस पाटलांचे सध्याचे मानधन मासिक तीन हजार आहे़ हे मानधन पाच हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणीही संघटनेने केली आहे़
तालुक्यात साझ्यानुसार २६ कोतवालांच्या जागा शासनमान्य आहेत़ शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासकीय कामांत मदत करण्यासाठी या जागा महत्त्वाच्या असतात़ सेवानिवृत्ती व इतर कारणांनी कोतवालांच्या आठ जागा रिक्त झाल्या आहेत़ या रिक्त जागा त्वरित भरल्या जाव्यात, यासाठी चार महिन्यांपूर्वी साखळी उपोषण करण्यात आले होते; पण कोतवालांची नियुक्ती करताना उमेदवार त्या गावचा रहिवासी असावा की बाहेरगावचा रहिवासी असला तरी चालेल, या संभ्रमात अद्यापही जागा भरण्यात आलेल्या नाहीत. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मागवून त्वरित या आठही जागा भराव्यात, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांद्वारे करण्यात येत आहे़ अल्प मानधनावर कोतवालांची वा पोलीस पाटलांची नियुक्ती केली जात असतानाही नियुक्तीसाठी विलंब का, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे़
तलाठी, ग्रामसेवकांच्या कामांत कोतवाल अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावीत असतो. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीचा आढावा घेताना, गावाची खरी माहिती कोतवालच शासनाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना देत असतात़ यामुळे पोलीस पाटील व कोतवालाच्या रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या व लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा, अशी मागणी कारंजा तालुका पोलीस पाटील संघटनेमार्फत करण्यात आली आहे. आणखी विलंब झाल्यास संघटनेमार्फत आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेचे सचिव सुभाष चरडे, अध्यक्ष डॉ. भक्ते यांनी दिला आहे.(तालुका प्रतिनिधी)