'समृद्धी' मार्गाप्रमाणेच 'शक्तिपीठ' करिताही शेतीची थेट खरेदी करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 17:27 IST2025-01-16T17:25:40+5:302025-01-16T17:27:00+5:30
प्रशांत तिगावकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी : ८०२ किलोमीटस्चा बनविणार शक्तीपीठ महामार्ग

Just like the 'Samriddhi' path, buy agricultural land directly for 'Shaktipith' too
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांकडून थेट खरेदीची प्रक्रिया अवलंबली गेली. तीच प्रक्रिया शक्तिपीठ महामार्गात करावी, जेणेकरून शेतकऱ्यांचा विरोध राहणार नाही व महामार्गही पूर्ण होईल, अशी मागणी कृषिमूल्य आयोगाचे माजी सदस्य तथा भाजप राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रशांत इंगळे तिगावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे.
नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्ग रस्ते विकास महामंडळाकडे दिला आहे. पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया सुरू झाली असून केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर केला आहे. या महामार्गासाठी भूसंपादनाची अधिसूचना लवकरच काढली जाणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गाप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात यावे. 'समृद्धी' प्रमाणेच जमिनीचे दर निश्चित करणारी समिती गठित करून दर ठरवावे. जेणेकरून शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळेल व विरोध होणार नाही. या महामार्गामध्ये विकासाचा ट्रिगर पुणे- मुंबईप्रमाणे विदर्भ, मराठवाडा येथे होईल. येणाऱ्या गुंतवणुकीने या भागाचा विकास होणार असल्याची अपेक्षाही प्रशांत इंगळे तिगावकर यांनी व्यक्त केली.
जमिनीला पाच पट मोबदला देण्यात यावा...
शक्तिपीठ हा ८०२ किलोमीटरचा महामार्ग असून याकरिता ९ हजार ३८५ हेक्टर जमीन घेतली जाणार आहे. हा ८६ हजार ३०० कोटींचा हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी रस्ते विकास महामंडळ सक्षम असून, ज्याप्रमाणे समृद्धी महामार्गाकरिता शेतकऱ्यांना पाच पट मोबदला दिला गेला, त्याचप्रमाणे शक्तिपीठाकरिताही देण्याची मागणी करण्यात आली.