जनसंघ, जनता पार्टी ते भाजप वाटचालीत पहिले यश आर्वीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:24+5:30

भाजपचा प्रवास वर्धा जिल्ह्यात जनसंघापासून सुरू झाला. या प्रवासात यशाची पहिली कमान दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघात उभारली. त्यापूर्वी सर्व निवडणुका जनसंघ, जनता पार्टी व भाजपने प्रातिनिधिक स्वरूपातच लढल्यात, असे वर्धा जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकींचे सिंहावलोकन केल्यावर दिसून येते.

Jansangh, Janata Party to BJP, achieved its first success | जनसंघ, जनता पार्टी ते भाजप वाटचालीत पहिले यश आर्वीत

जनसंघ, जनता पार्टी ते भाजप वाटचालीत पहिले यश आर्वीत

ठळक मुद्दे२०१४ मध्ये दोन जागांवर मिळविला भाजपने विजय

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आज ज्या भारतीय जनता पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी चढाओढ लागली आहे, त्या भाजपचा प्रवास वर्धा जिल्ह्यात जनसंघापासून सुरू झाला. या प्रवासात यशाची पहिली कमान दादाराव केचे यांनी आर्वी विधानसभा मतदारसंघात उभारली. त्यापूर्वी सर्व निवडणुका जनसंघ, जनता पार्टी व भाजपने प्रातिनिधिक स्वरूपातच लढल्यात, असे वर्धा जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकींचे सिंहावलोकन केल्यावर दिसून येते.
१९६२ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीत जनसंघाचे उमेदवार म्हणून हिंगणघाटमधून यशवंत वसंत सरोदे रिंगणात होते. त्यांना १,६६६ मते मिळाली. याच निवडणुकीत वर्ध्यावरून विठ्ठल तुकाराम मेश्राम, पुलगाववरून गणपत सदाशिव चांदेकर यांनी निवडणूक लढविली. मेश्राम यांना ३,६७१, चांदेकर यांना ५,३४१ मते मिळाली. त्यानंतर भारतीय जनसंघाकडून १,९६७ ला वर्ध्यातून आर.डी.सावल निवडणूक लढलेत. सावल यांना ३,९७३ मते मिळाली. त्यानंतर १९७२ मध्ये पुलगाव मतदारसंघातून भारतीय जनसंघाकडून रामराव बापूजी पोहेकर यांनी निवडणूक लढविली. पोहेकरांना १,२७३ मते मिळाली होती. त्याचवर्षी हिंगणघाट मतदार संघातून विठ्ठल कोसुरकर भारतीय जनसंघाकडून मैदानात होते. कोसुरकरांना २,६०५ मते मिळाली. १९७८ ला जनता पक्षाकडून आर्वी मतदारसंघातून धैर्यशील विनायक राव वाघ यांनी निवडणूक लढविली. वाघ यांना निर्णायक ११ हजार ८९० मते मिळाली. त्यांनतर एकदम १९९० मध्ये पुलगाव मतदारसंघातून विजयकुमार निवल तर वर्धा मतदारसंघातून पुरुषोत्तम इंगळे निवडणूक लढलेत. निवल यांना ५,१९७ तर इंगळे यांना ३,४४१ मते मिळाली. त्यानंतर १९९५ ला आर्वी मतदारसंघातून भाजपकडून दादाराव यादवराव केचे यांनी निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांना ४६९४ मते मिळाली. तर पुलगाव मतदारसंघातून पुरुषोत्तम फुलकरी निवडणूक लढले. फुलकरींना १२,४१९ मते मिळाली. १९९९ मध्ये पुलगाव मतदारसंघातून चरणसिंग चावरे, आर्वीतून विजयराव मुडे या दोघांनी भाजपकडून निवडणूक लढविली. यात चावरे यांना १५,४५९ तर विजय मुडे यांना ३१,२५४ मते मिळाली. त्यानंतर २००४ मध्ये आर्वीतून दादाराव केचे निवडणूक लढलेत. त्यांना ४५ हजार ८६१ मते मिळाली. त्यानंतर २००९ मध्ये आर्वीतून पुन्हा दादाराव केचे निवडणूक लढले. त्यांना ७१ हजार ६९४ तर पुलगावमधून रामदास तडस यांना ५४ हजार ८२० मते मिळाली. या संपूर्ण जनसंघ, जनता पार्टी ते भाजप या प्रवासात २००९ मध्ये दादाराव केचे विजयी झालेत. हाच भाजपचा वर्धा जिल्ह्याच्या इतिहासातील पहिला विजय होता. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत वर्धा व हिंगणघाट या दोन मतदारसंघात भाजपने आपले आमदार निवडून आणले आणि जिल्ह्याच्या राजकारणात भाजपला राजकीयदृष्ट्या ‘अच्छे दिन’ आले.

Web Title: Jansangh, Janata Party to BJP, achieved its first success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.