पाटबंधारे विभागाच्या वसाहती झाल्या ‘खंडर’
By Admin | Updated: February 27, 2016 02:27 IST2016-02-27T02:27:04+5:302016-02-27T02:27:04+5:30
कोट्यवधी रूपये किंमत असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या कर्मचारी वसाहतीची दैनावस्था झाली आहे. या वसाहती आता नावापुरत्याच राहिल्या असून

पाटबंधारे विभागाच्या वसाहती झाल्या ‘खंडर’
शासकीय औदासीन्य : घरे मोजताहेत अखेरच्या घटका
विजय माहुरे सेलू
कोट्यवधी रूपये किंमत असलेल्या जागेवर बांधण्यात आलेल्या कर्मचारी वसाहतीची दैनावस्था झाली आहे. या वसाहती आता नावापुरत्याच राहिल्या असून वसाहतीच्या पुनर्निर्माणाकरिता पाटबंधारे विभागाला अच्छे दिन कधी येणार याची प्रतीक्षा कायम आहे.
सेलू तालुक्यातील कृषी क्षेत्र सुजलाम सुफलाम बनविण्यासाठी बोर धरणाची सिंचन व्यवस्था उपयोगी ठरली. बोरधरण (यशवंत धरण) ला ५० वर्ष पूर्ण झाले त्यावेळी सेलू, केळझर व हिंगणी येथे सिंचन व्यवस्था सांभाळण्यासाठी कार्यालये व कर्मचाऱ्यांसाठी वसाहती बांधकाम आल्या. सुरुवातीला या वसाहतीत कर्मचारी राहत असत. पण दिवसेंदिवस वसाहतीच्या डागडुजीकडे दर्लक्ष होत गेले. त्यातच कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर पदभरती थांबल्याने या वसाहती पोरक्या होत गेल्या. अधिकारीच परजिल्ह्यातून सिंचन व्यवस्था सांभाळत असेल तर आम्ही मुख्यालयी का रहावे अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याने या वसाहतींची आणखीनच वाताहत होत पडझड सुरू झाली.
सध्या या वसाहतींच्या सभोवताल मोठ मोठी झाडे वाढली आहेत. झाडाझुडपांच्या कचाट्यात शेवटच्या घटका या वसाहती मोजत आहेत.
बोरधरण, हिंगणी, सेलू, केळझर येथील वसाहतीचे खस्ताहाल पाहता पाटबंधारे विभाग केवळ नावापुरताच तर नाही ना अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अनेक वर्षांपासून वितरिका, सायपण, पाणचऱ्यांची पुरती वाट लागल्याचे लक्षात येते. जलसंपत्तीचा अपव्यय होत असून कुणालाही याचे देणे घेणे नसल्याचे वास्तव आहे. लाखो लीटर पाण्याचा अपव्यय थांबविण्यात जर यश आले तर अधिक शेती सिंचनाखाली येवू शकते.
सेलू येथे असलेली उपविभागीय अभियंता कार्यालयाची इमारत गत १५ वर्षापूर्वी नव्याने बांधण्यात आली. पण अल्पावधीतच या इमारतीच्या खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. इमारतीला भेगा पडण्यास सुरूवात झाली आहे. ही इमारत आणि वसाहत वर्धा-नागपूर व सेलू-बोधरण या मार्गावर चौकाला लागून आहे. कोट्यवधी रुपयांची जागा आज पडीक जमिनीचे रूप धारण करीत आहे.
बोधरणापासून केळझरवरून पुढे जाणाऱ्या मुख्य कालव्यात वाढलेली झाडेझुडपे पाहता शेताच्या बांधापर्यंत जाणाऱ्या पाटचऱ्याची काय अवस्था असेल याचा प्रात्यय येतो. पण याकडे लक्षच दिले जात नसल्याची खंत तालुकावासी व्यक्त करीत आहे.
चांगल्या दिवसाची स्वप्ने दाखविणाऱ्या शासनाच्या आगामी अधिवेशनात तरी बोर प्रकल्पाच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले जाणार हा असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पालकमंत्री वर्धा जिल्ह्यातील अनेक समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेत निधींची पूर्तता करीत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राला चांगले दिवस येण्यासाठी पाटबंधारे विभागाकडेही लक्ष दिल्यास दुरावस्था थांबू शकेल अशी आशा व्यक्त होत आहे.