पारंपरिक विरोधकांचे मनोमिलन

By Admin | Updated: August 2, 2015 02:37 IST2015-08-02T02:37:46+5:302015-08-02T02:37:46+5:30

तालुक्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी होत आहे.

Interjection of traditional opponents | पारंपरिक विरोधकांचे मनोमिलन

पारंपरिक विरोधकांचे मनोमिलन

प्रफुल्ल लुंगे  सेलू
तालुक्यात प्रतिष्ठेची समजली जाणारी सिंदी (रेल्वे) कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक रविवारी होत आहे. या निवडणुकीत पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या तिनही गटांच्या नेत्यांचे झालेले मनोमिलन, भाजपा समर्थित गट व नव्यानेच पत्रकार-शेतकरी समर्थित आघाडीने या निवडणुकीत उमेदवार उभे केल्याने निवडणुकीत चुरस वाढली आहे.
शह काटशहाच्या या निवडणुकीत यंदा साऱ्यांनीच पत पणाला लावली आहे. यंदाच्या निवडणुकीत दरवर्षी एमेकांविरोधात निवडणूक लढविणारे विजय जयस्वाल, शेखर शेंडे व सहकार नेते प्रा. सुरेश देशमुख यांचे गट एकत्र आले आहेत. त्यांना शह देण्यासाठी प्रथमच भाजपा समर्थित आघाडी रिंगणात आहे. पत्रकार व शेतकरी समर्थित आघाडीच्या उमेदवारांमुळे प्रस्तापितांचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.
सहकार गट, जयस्वाल गट व शेंडे गट एकत्र आल्याने अनेक उत्सुकांना उमेदवारांना ऐनवेळी उमेदवारी मागे घ्यावी लागली. हिच स्थिती भाजपा समर्थित आघाडीतही झाल्याने असंतोषाचे वातावरण धगधगत आहे. त्यामुळे प्रचार आणि प्रत्यक्ष कृतीत तफावत दिसत आहे. या कारणाने विजयाचा कौल हुलकावणी देत आहे. आजी-माजी आमदार, आजी-माजी जि.प. अध्यक्ष प्रचारात गुंतले आहेत. असे असतानाही मतदारांपर्यंत पोहचून प्रचार करण्यात त्यांच्याकडून उदासीनता दिसत आहे.
काहींनी प्रत्यक्ष मतदारांना भेटून प्रचारावर जोर दिला आहे. या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. यामुळे विजयाचे पारडे कुणाकडे झुकणार हे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र गटागटात असलेले असंतोषाचे वातावरण या निवडणुकीत विजयाचे गणित मांडणार हे मात्र निश्चित आहे. यामुळे निवचडणुकीकडे राजकीय जानकारांसह या भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
९४७ मतदार करणार मतदान
या निवडणुकीत ग्रा.पं. गटात ४९५, सेवा सहकारी गटात ३४५ तर हमाल व मापारी गटात १०७ मतदार मतदान करणार आहेत. निवडणुकीची मतमोजणी व निकाल सोमवारी जाहीर होणार आहे.
दोन जागा अविरोध
१८ सदस्यीय असलेल्या या बाजार समितीच्या निवडणुकीत व्यापारी संघाच्या दोन जागा अविरोध ठरल्या. यामुळे उर्वरीत १६ जागांसाठी निवडणूक होत असून एकूण ३९ उमेदवार रिंगणात आहे.
ग्रामपंचायत सर्वसाधारण गटात दोन जागेसाठी सात उमेदवार, ग्रा.पं. अनु. जाती-जमातीच्या एका जागेसाठी दोन, ग्रा.पं. आर्थिक दुर्बलच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. सेवा सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण गटाच्या सात जागेसाठी १६ तर याच गटाच्या महिलेच्या दोन जागेसाठी चार, भटक्या वि.जमातीच्या एका जागेसाठी दोन उमदेवार रिंगणात आहे. इतर मागासर्गीयांच्या एका जागेसाठी दोन उमेदवार आहेत. हमाल व मापारीच्या एका जागेसाठी तीन उमेदवार रिंगणात आहेत.

Web Title: Interjection of traditional opponents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.