गुप्तचर विभाग, राजकीय पंडितांचीही कसोटी

By Admin | Updated: October 16, 2014 23:29 IST2014-10-16T23:29:57+5:302014-10-16T23:29:57+5:30

तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्ष एकमेकांविरोधात विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. पर्यायाने या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधताना भलेभले राजकीय पंडित आणि शासनाच्या गुप्तचर

The intelligence department, the examinations of the political scholars | गुप्तचर विभाग, राजकीय पंडितांचीही कसोटी

गुप्तचर विभाग, राजकीय पंडितांचीही कसोटी

निवडणुकीचे अंदाज : सर्वच मतदारसंघात धक्कादायक निकालाची चिन्हे, उत्सुकता शिगेला
राजेश निस्ताने - यवतमाळ
तब्बल २५ वर्षानंतर सर्वच पक्ष एकमेकांविरोधात विधानसभेची निवडणूक लढवित आहेत. पर्यायाने या निवडणुकीच्या संभाव्य निकालाचे अंदाज बांधताना भलेभले राजकीय पंडित आणि शासनाच्या गुप्तचर विभागाचीही (इंटेलिजन्स ब्युरो) दमछाक होताना पहायला मिळत आहे. एकूणच १९ आॅक्टोबर रोजी सर्वच विधानसभा मतदारसंघात धक्कादायक निकाल हाती येण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
कोणतीही निवडणूक म्हटली की त्याचे प्लस-मायनस, अंदाज सांगणाऱ्यांची कमी नाही. प्रत्येकच गावात असे काही ‘तज्ज्ञ’ असतातच. या तज्ज्ञांना मतदारसंघातील कोण माणूस कुणाचे काम करू शकतो, कोणत्या जातीची किती मते आहे, कोण व्यक्ती नेमके कुणाचे ऐकू शकतो, अखेरच्या क्षणी कुणी कोणते चिन्ह चालविले, काय हवा होती आणि कोण कोणत्या क्रमांकावर राहू शकते याची इत्यंभूत माहिती असते. त्यासाठी ते निवडणुकीच्या पूर्वीपासून आकडेमोड करतात. अशा निवडणुकांचा दीर्घ अनुभव असल्याने स्थानिक पातळीवरील या तज्ज्ञांचे अंदाज बहुतांश वेळा खरेही निघतात. असे अंदाज खरे निघणाऱ्यांची संख्या मात्र अवघी बोटावर मोजण्याऐवढी असते. निवडणूक झाली की, प्रत्येकच उमेदवार अशा तज्ज्ञांकडून अंदाज ऐकण्यासाठी उत्सुक असतो. या पूर्वीचे अंदाज खरे निघाले म्हणून उमेदवारांनाही या तज्ज्ञांच्या गणितीय कौशल्यावर प्रचंड विश्वास असतो. परंतु यावेळी या तज्ज्ञांचे गणितीय अंदाजही कोलमडण्याची चिन्हे आहेत. गेल्या दोन दशकात पहिल्यांदाच या तज्ज्ञांमध्ये संभ्रमावस्था पहायला मिळत आहे. कारण १५ वर्षानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी तर २५ वर्षानंतर भाजपा व शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवित आहे. प्रत्येक मतदारसंघात भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षाच्या उमेदवाराशिवाय बसपा, मनसे व अन्य अपक्ष उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवित आहे. यावेळसारखी विचित्र राजकीय परिस्थिती कधीही निर्माण झालेली नाही. भल्याभल्यांना या निवडणुकीचे अंदाज बांधणे कठीण होऊन बसले आहे. कारण प्रत्येकच मतदारसंघात किमान तिरंगी सामना पहायला मिळत आहे. यवतमाळ, उमरखेड, वणी या मतदारसंघामध्ये तर पंचरंगी लढती आहेत. दिग्रस, पुसद, आर्णी-केळापूरमध्ये तिरंगी तर राळेगावमध्ये थेट दुहेरी लढत पहायला मिळत आहे. या बहुरंगी लढतीमुळे नेमके अंदाज बांधणे जमेनासे झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात कोणताही उमेदवार दहा हजारापेक्षा अधिक मताधिक्य घेऊ शकणार नाही, यावर सर्वच राजकीय तज्ज्ञांचे एकमत होताना दिसत आहे. पंचरंगी लढती असलेल्या मतदारसंघात विजयी उमेदवार अगदी काठावर निघेल, असे मानले जात आहे. जिल्ह्यात सात पैकी तब्बल पाच जागा काँग्रेसच्या आहेत. परंतु यावेळी काँग्रेस बऱ्यापैकी मायनस होणार, असा अंदाज बांधला जात आहे. गेल्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपाला खातेही उघडता आले नव्हते. यावेळी मात्र भाजपा खाते उघडण्यासोबतच त्यात बॅलन्सही ठेवण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील दोन-तीन जागांवरील आमदार पुन्हा निवडून येणार असे प्रत्येकच जण निवडणुकीच्या खूप आधीपासून तर मतदानाच्या दिवसापर्यंत दाव्याने सांगत होते.
मात्र मतदानाची टक्केवारी, झालेले मतदान आणि मतदानाच्या रात्री घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर या तीन जागांवरील तज्ज्ञांचा दावाही संभ्रमात सापडला आहे. ते पाहता या विधानसभा निवडणुकीचे अगदी स्फोटक निकाल लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
राजकीय तज्ज्ञच नव्हे तर महाराष्ट्र पोलीस दलाचा राज्य गुप्त वार्ताविभाग (स्टेट इंटेलिजन्स) यावेळी पहिल्यांदाच प्रचंड संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी आपले अहवाल पाठविले असले तरी त्यांनी संभाव्य विजयी उमेदवार म्हणून सूचविलेल्या नावांबाबत ते स्वत:च साशंक असल्याचे चित्र पहायला मिळाले. यावरून यावेळच्या निवडणुका गुप्तचरांसोबतच दीर्घ अनुभवी राजकीय विश्लेषकांचीही परीक्षा पाहणाऱ्या ठरल्या आहेत.

Web Title: The intelligence department, the examinations of the political scholars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.