जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य केंद्राची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 05:00 IST2020-05-04T05:00:00+5:302020-05-04T05:00:02+5:30
जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर असलेल्या अमरावती, नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे यांनी आरोग्य केंद्राला भेट देत केंद्रातील उपाययोजनांचा आढावा घेतला.

जिल्हाधिकाऱ्यांकडून आरोग्य केंद्राची पाहणी
लोकमत न्यूज नेटवर्क
साहूर : येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांनी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर भेट देऊन अत्यावश्यक सोयी, सुविधेबाबात वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आरोग्य केंद्राची पाहणी केली.
जिल्ह्याच्या अखेरच्या टोकावर असलेल्या अमरावती, नागपूर जिल्ह्याच्या सीमेवर वसलेल्या साहूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी सचिन ओंबासे यांनी आरोग्य केंद्राला भेट देत केंद्रातील उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवश्यक सोयी-सुविधांबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ. भागवत, राऊत यांच्यासह वैद्यकीय चमूंशी चर्चा करून दैनंदिन माता-बाल संगोपन व दैनिक लसीकरण व्यवस्थित करण्यात यावे, तापाच्या रुग्णांसाठी वेगळी तपासणी व्यवस्था करण्यात यावी, औषधी साठ्याची तपासणी करून कोविड १९ बाबत जीवनरक्षक साहित्य उपलब्धतेबाबत पाहणी केली, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात सुव्यवस्थेबाबत चौकशी करून उद्यान परिसराची पाहणी केली. एकंदरीत साहूर प्राथमिक आरोग्य केंद्राची आरोग्यविषयक सुव्यवस्था पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर दृगवाडा येथील पोलीस तपासणी नाक्याला भेट देऊन काही आवश्यक सूचना केल्या. लगतच असलेल्या तारासावंगा येथून नागपूर जिल्ह्याची सीमा प्रारंभ होते तर अगदी दीड किलोमीटर दृगवाडा येथून अमरावती जिल्ह्याची सीमा प्रारंभ होते. त्यामुळे इतर जिल्ह्यातून कुणाचाही शिरकाव छुप्या मार्गाने जिल्ह्यात होऊ नये, याची खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.
मागील आठवड्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री सुनील केदार यांनी देखील भेट देऊन पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, तहसीलदार आशिष वानखडे, गटविकास अधिकारी अनिल गावंडे, तालुका आरोग्य अधिकारी कासारे, मंडळ अधिकारी ओमप्रकाश बारस्कर आदींसह वैद्यकीय अधिकाºयांची तसेच पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
कारंजाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट
कारंजा(घा.) : जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी कारंजा शहराला भेट देवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध संस्थाची पाहणी केली. यावेळी सीईओ डॉ. सचिन आेंबासे, एसडीओ हरिष धार्मिक, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, न.प. मुख्याधिकारी पल्लवी राऊत, तहसीलदार सचिन कुमावत, ठाणेदार राजेंद्र गेटे, बीडीओ उमेश नंदागवळी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांनी सिंदीविहिरी येथे तयार करण्यात आलेल्या २५ खाटांच्या विलगीकरण केंद्राला भेट दिली. कृषी उत्पन्न बाजार समिती, कारंजा उपबाजाराला भेट देऊन लॉकडाऊनचे नियम पाळले जातात किंवा नाही याची पाहणी केली.