धडक मोहिमेंतर्गत बोअरवेल वाहनांची होणार तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 00:17 IST2019-03-06T00:16:53+5:302019-03-06T00:17:40+5:30
शहरात अन्य राज्यातील बोअरवेल दाखल होत आहेत. याशिवाय शहरात असलेल्या बोअरवेल व्यावसायिकांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अथवा नाही, याकरिता धडक तपासणी मोहीम राबविणार असून कारवाई करण्यात येईल.

धडक मोहिमेंतर्गत बोअरवेल वाहनांची होणार तपासणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात अन्य राज्यातील बोअरवेल दाखल होत आहेत. याशिवाय शहरात असलेल्या बोअरवेल व्यावसायिकांनीही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली आहे अथवा नाही, याकरिता धडक तपासणी मोहीम राबविणार असून कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात निर्देश दिल्याची माहिती सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय तिराणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
दरवर्षी उन्हाळ्यात जिल्ह्यात कर्नाटक, आंध्रप्रदेश येथील बोअरवेल वाहने दाखल होतात. जलसंकट गडद होण्याची चिन्हे असल्याने यावेळी डिसेंबरपासूनच बोअरिंग करण्याला उधाण आले आहे. शहरात २६ ते २७ वाहने इतर राज्यातून आलेली आहेत. ही वाहने वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून शहरात प्रवेश करतात. जिल्ह्यात प्रवेश करताना अनेकवार त्यांच्याकडून शासनाचा करही बुडविला जातो. यासोबतच शहरात ८ ते १० बोअरवेल वाहने आहेत. या वाहनांच्या परवान्याचे नूतनीकरण, फिटनेस सर्टिफिकेट व इतर कागदपत्रांची व्यावसायिकांनी पूर्तता करणे गरजेचे आहे. मात्र, अनेक व्यावसायिकांकडून या कागदपत्रांची पूर्तताच केली नसल्याचे उजेडात आली आहे.
ही बाब उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी सहकारी अधिकाऱ्यांना शहरातील व्यावसायिकांची बोअरवेल वाहने व अन्य राज्यातून दाखल होणाºया वाहनांची धडक तपासणी मोहीम राबवून कारवाई करण्याचे निर्देश दिले.