पायका योजनेंतर्गत बांधलेल्या क्रीडांगणाची चौकशी करा
By Admin | Updated: May 17, 2014 23:50 IST2014-05-17T23:50:20+5:302014-05-17T23:50:20+5:30
शासनाच्या अनेक उत्तम योजना आहेत; पण संबंधीत अधिकार्यांच्या अपप्रकारच्या वृत्तीमुळे या योजना केवळ कागदावरच राबविल्या जातात़

पायका योजनेंतर्गत बांधलेल्या क्रीडांगणाची चौकशी करा
विरूळ (आकाजी) : शासनाच्या अनेक उत्तम योजना आहेत; पण संबंधीत अधिकार्यांच्या अपप्रकारच्या वृत्तीमुळे या योजना केवळ कागदावरच राबविल्या जातात़ असाच प्रकार सध्या क्रीडा क्षेत्रातही पाहावयास मिळत आहे़ शासनाद्वारे क्रीडांगणासाठी निधी दिला जातोय; परंतु केवळ फलकांपुरते क्रीडांगण दाखवून निधीचा अपहार केला जातो़ यात हजारो रुपयांचा गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे़ याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी होत आहे़ ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे़ त्यांना खेळण्यासाठी गावात मैदान असावे, या प्रामाणिक हेतूने पायकांतर्गत क्रीडांगण तयार करण्यासाठी प्रत्येक पंचायत समितीला निधी देण्यात आला़ पंचायत समितीमार्फत तालुक्यातील काही निवडक गावात क्रीडांगण तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ त्याचप्रमाणे आणि तालुक्यातही पंचायत समितीस्तरावर १४ गावांना या क्रीडांगणसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला़ यात विरूळ, रसुलाबाद, रोहणा, धनोडी, दहेगाव (मुस्तफा), देऊरवाडा, वर्धमनेरी, मांडला, वडगाव, वाढोणा, मोरांगणा, जळगाव, वाठोडा व शिरपूर आदी गावांचा समावेश आहे़ क्रीडांगणासाठी निधी उपलब्ध झाल्याने वाठोडा व शिरपूर वगळता १२ गावामध्ये क्रीडांगण तयार झालीत, परंतु काही महिन्यातच या क्रीडांगणाची वाताहत झाली आहे़ लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या क्रीडांगणावर आज विद्यार्थी खेळत नसले तरी गुरे-ढोरे मात्र हमखास चरतांना दिसतात़ क्रीडांगणावर काटेरी झुडपे, गवत उगविल्याने नेमके क्रीडांगण कोठे आहे़ याचा शोध घ्यावा लागतो़ या क्रीडांगणावर केवळ नावापुरता फलक लागला आहे़ काही गावात गावाच्या बाहेर दूर क्रीडांगणे बांधल्या गेली़ त्यामुळे विद्यार्थी क्रीडांगणावर खेळण्यास जातच नसल्याचे दिसते़ क्रीडांगण तयार करण्यासाठी एक लाख रुपये ग्रामपंचायतींना देण्यात आले़ मैदान तयार झाले़ पण खेळाडूंच्या साहित्यासाठी अद्यापही निधी न मिळाल्याने हे क्रीडांगणे शोभेची वस्तू ठरली आहे़ क्रीडांगणाच्या बांधकामाची जबाबदारी पंचायत समितीचा शाखा अभियंता व ग्रामसेवकांकडे सोपविण्यात आली. ही संधी मिळताच काही ग्रामसेवकांनी मर्जितल्या ठेकेदाराला काम देत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून या कामात गौडबंगाल झाल्याचा संशय येतो़ यामुळे संबंधीत अधिकार्यांनी क्रीडागणाची चौकशी करण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)