केळीवर ‘करप्या’ रोगाचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 06:00 IST2019-11-28T06:00:00+5:302019-11-28T06:00:19+5:30

सेलू तालुक्यातील खडकी धानोली या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकांच्या बागा आहेत. केळी पिकावर करप्या रोगाने अतिक्रमण केल्याने बागेत असलेले केळीचे पीक गळून खाली पडत आहेत. केळीच्या झाडांची पाने देखील करपायला सुरुवात झाली आहे. तर कुठे-कुठे या रोगाने केळीचे आपोआप झाडे सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे.

Influence of 'curly' disease on banana | केळीवर ‘करप्या’ रोगाचा प्रादुर्भाव

केळीवर ‘करप्या’ रोगाचा प्रादुर्भाव

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने केळी उत्पादक आर्थिक संकटात : १७ ते १८ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : एकेकाळी सेलू तालुका हा केळी उत्पादनात विदर्भात अव्वल क्रमांकावर होता. परंतु, सध्या परतीच्या पावसाने सेलु तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. मागील आठवड्यात परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. आता केळीच्या पिकावर परतीच्या पावसाने ‘करप्या' रोग आला असून शेतकऱ्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे.
सेलू तालुक्यातील खडकी धानोली या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी पिकांच्या बागा आहेत. केळी पिकावर करप्या रोगाने अतिक्रमण केल्याने बागेत असलेले केळीचे पीक गळून खाली पडत आहेत. केळीच्या झाडांची पाने देखील करपायला सुरुवात झाली आहे. तर कुठे-कुठे या रोगाने केळीचे आपोआप झाडे सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे खडकी धानोली परिसरातील केळी उत्पादकांवर आर्थिक संकटाचे डोंगर उभे ठाकले असून पुढील पीक कसे घ्यावे, याच विवंचनेत ते आहेत.
यावर्षी जिल्ह््यात पावसाचे प्रमाण जास्त होते. परतीचा पाऊस मोठ्याप्रमाणात आला आणि पावसाने केळी पिकांवर करप्या रोग आला. करप्या आल्याने बागेतील केळीच्या झाडांचे पाने सुकली, पाने वाळली, त्यामुळे सूर्यापासून झाडांना मिळणारे अन्नद्रव्य कमी झालं आहे. त्यामुळे केळीचे झाडे स्वत: मुळातून कोलमडून पडत आहेत आणि त्याचा घड खाली पडत आहे. केळीचं एक झाड जगवायला ३०० रुपये लागतात. या भागात ५ हजार ४०० केळींची झाडे आहेत. परतीच्या पावसामुळे जवळ-जवळ १६ ते १७ लाख रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने केळी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून होत आहे.

शेतकरी सावकारांच्या दारात
जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकºयांचे हातचे पीक वाया गेले. सोयाबीन, कपासी, हरभरा, तूर आदी पिकांसह केळीच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असल्याने त्यांच्याकडे सावकारांच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. परिणामी, शेतकरी आत्महत्या करण्यासारखे गंभीर पाऊल उचलत आहे. शासनाने नुकसानग्रस्त केळी उत्पादकांच्या नुकसानीची पहाणी करत त्यांना तत्काळ आर्थिक मदत करणे गरजेचे आहे.

यावर्षी भरपूर प्रमाणात पाऊस झाला. जमिनी वाफया नाही करता आल्या. तीन महिन्यापर्यंत केळीची वाढ झाली नाही. त्यामुळे परतीच्या पावसामुळे आता केळीच्या झाडांवर करप्या रोग आला. परतीच्या पावसाने केळी उत्पादक शेतकºयांचे पुरते कंबरडे मोडले असून करप्या रोगावर नियंत्रण मिळवणे कठीण आहे. त्यामुळे आम्ही मोठ्या आर्थिक अडचणीत सापडलो आहोत. शासनाने याकडे लक्ष देत तत्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे.
कुंदन वाघमारे, केळी उत्पादक,शेतकरी

जिल्ह्यामध्ये फळ पिकाखाली ४ हजार हेक्टर क्षेत्र आहे. जास्तीत जास्त क्षेत्र हे आर्वी, आष्टी, कारंजा या तीन तालुक्यांमध्ये आहे. केळी संदर्भात जी तक्रार झाली आहे. नैसर्गिक आपत्ती या सत्राखाली मोडत नाही, त्यावर करपा रोग आला असल्याची माहिती आहे. त्याठिकाणी आम्ही कृषी विभागाचे अधिकारी पाठवून नेमकं काय झालं ते पाहून केळी उत्पादकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.
अनिल इंगळे, कृषी अधीक्षक, वर्धा

Web Title: Influence of 'curly' disease on banana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती