कायम परवान्याची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढवा
By Admin | Updated: July 11, 2016 02:01 IST2016-07-11T02:01:12+5:302016-07-11T02:01:12+5:30
केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीप्रमाणे वाहन चालविण्याच्या कायम परवान्याची मर्यादा ५० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे.

कायम परवान्याची मर्यादा ६५ वर्षांपर्यंत वाढवा
जनमंचची मागणी : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री व प्रशासनाला साकडे
रोहणा : केंद्रीय मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या तरतुदीप्रमाणे वाहन चालविण्याच्या कायम परवान्याची मर्यादा ५० वर्षांपर्यंत ठेवण्यात आली आहे. यामुळे ५० वर्षानंतर वाहन परवान्याची मुदत दर पाच वर्षांनी वाढविण्यासाठी वाहन चालकाला परिवहन कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. उतार वयात चकरा मारणे सर्वांना अवघड होते. यामुळे कायम परवान्याची मर्यादा ६५ वर्षे करावी, अशी मागणी जनमंचने केली आहे.
काही वर्षांपूर्वी जनमंचने एका आरटीओ अधिकाऱ्याची प्रकरणे उघड केली होती. त्या अधिकाऱ्याने एका दिवसात सर्वप्रकारचे दोन हजार परवाने वितरीत करण्याचा पराक्रम केला होता. सदर प्रकरण न्यायालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईही करण्यात आली होती.
शासनाने वाहन परवान्याचे नुतनीकरण ५० वर्षांनंतर करण्याचा नियम केला; पण या नियमाचा जनतेची आर्थिक पिळवणूक करण्यासाठी उपयोग होत आहे. आजच्या प्रचलित व्यवस्थेत सर्वांच्याच वाहन परवान्याचे पाच वर्षांसाठी नुतनीकरण करून मिळते. एखाद्या व्यक्तीला वाहन चालविणे शक्य नसल्यास तो वाहन चालविणारच नाही. यासाठीच पाच वर्षांनंतर नुतनीकरण करण्याचा नियम शिथील करणे काळाची गरज आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाप्रमाणे माणसाच्या जीवन जगण्याच्या कालमर्यादेत वाढ झाली आहे. अनेक शासकीय कार्यालयांत कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय हे ६५ वर्षांपर्यंत वाढविण्यात आले आहे. कायम परवान्याची कालमर्यादा वाढविल्यास आरटीओ कार्यालयातील कामाचा बोझा कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मनुष्यबळाच्या कमतरतेची ओरड कमी होण्यास मदत होणार आहे.
याबाबत जनमंचद्वारे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले आहे. जनमंचच्या निवेदनाची दखल घेत याबाबत संबंधितांना पत्र पाठविण्यात आले आहे. जनतेचा पैसा आणि वेळ वाचविण्यासाठी वाहन परवान्याची कालमर्यादा ६५ वर्षांपर्यंत करण्याची मागणी नागपूर जनमंचचे उपाध्यक्ष प्रमोद पांडे, आर्वी तालुका जनमंचचे फनिंद्र रघाटाटे, प्रकाश टाकळे, बाळासाहेब गलाट, हितेंद्र बोबडे, सुनील वाघ, दिलीप पांडे, मधुकर नायसे, दादासाहेब हिवसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केली आहे.(वार्ताहर)