शाळा-महाविद्यालय बंद उत्स्फूर्त
By Admin | Updated: July 23, 2014 23:44 IST2014-07-23T23:44:56+5:302014-07-23T23:44:56+5:30
महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी संघटनेतर्फे ओबीसी विद्यार्थ्यांच्यावतीने बुधवारी समुद्रपूर, हिंगणघाट व वर्धा येथे शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. मराठा सेवा संघाच्यावतीने

शाळा-महाविद्यालय बंद उत्स्फूर्त
विविध संघटनांचे आंदोलन : एकदिवसीय धरणे; निवेदन सादर
वर्धा : महात्मा फुले समता परिषद आणि ओबीसी संघटनेतर्फे ओबीसी विद्यार्थ्यांच्यावतीने बुधवारी समुद्रपूर, हिंगणघाट व वर्धा येथे शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. मराठा सेवा संघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. तीनही संघटनांचे कार्यकर्ते व विद्यार्थ्यांचा आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग होता. महाविद्यालय बंदला उत्तम प्रतिसाद मिळाला. निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महात्मा फुले समता परिषद, ओबीसी संघटना आणि ओबीसी विद्यार्थ्यांच्यावतीने विदर्भात बुधवारी शाळा, महाविद्यालय बंद आंदोलन करण्यात आले. त्यानुसार वर्धा येथे महात्मा फुले समता परिषद व ओबीसी विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालये बंद केली. यानंतर मुख्यमंत्री यांना पाठविण्यासाठी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय संघटक प्रा. दिवाकर गमे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा संघटक विनय डहाके यांनी निवेदन सादर केले़ यात ओबीसी विद्यार्थ्यांची थकित शिष्यवृत्ती त्वरित देण्यात यावी, ओबीसी शिष्यवृत्ती उत्पन्न मर्यादेचा सहा लाखांचा शासन निर्णय त्वरित काढावा, अनु़ जाती, जमातीप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांना १०० टक्के शिष्यवृत्ती देण्यात यावी, ओबीसी जणगणना करावी, ओबीसींचे स्वतंत्र मंत्रालय स्थापित करावे आदींसह अन्य मागण्यांचा समावेश होता. यावेळी संजय मस्के, शैलेश येळणे, गजानन देशमुख, श्याम जगताप, भास्कर नेवारे यांच्यासह समता परिषदेचे कार्यकर्ते व ओबीसी विद्यार्थी उपस्थित होते.
समुद्रपूर येथेही महात्मा फुले समता परिषदेंतर्गत ओबीसी संघटना व विद्यार्थी संघटनेच्यावतीने शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. यालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात ओबीसी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप डगवार, रोहीत काळे, आशिष चव्हाण, प्रफूल्ल लढी, चेतन भुरे, गजू काळे, हर्षदा खाडे, सौरभ साळवे, संदीप घरडे, अतुल कुंचलकर, गजानन वाघमारे आदी सहभागी झाले़
मराठा सेवा संघाचे धरणे
विविध मागण्यांकरिता मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिजाऊ ब्रिगेड, विर भगतसिंग विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय मराठा महासंघ, पद्मश्री विखे पाटील कृषी परिषद, छत्रपती संभाजी युवा संघटनेद्वारे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांना देण्यात आले. यावेळी राजाभाऊ वानखेडे, संजय मिसाळ, सुधीर पांगुळ, सुधीर गिऱ्हे, शेषराव शिंदे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते़(लोकमत न्यूज नेटवर्क)