गुंजखेडा घाटावर रेतीची अवैध लूट; प्रशासनाचा कानाडोळा
By Admin | Updated: May 18, 2014 23:51 IST2014-05-18T23:51:18+5:302014-05-18T23:51:18+5:30
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे सादर एका याचिकेवर निर्णय देताना राज्यातील सर्व रेतीघाट ११ जूनपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत़

गुंजखेडा घाटावर रेतीची अवैध लूट; प्रशासनाचा कानाडोळा
वर्धा : उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाकडे सादर एका याचिकेवर निर्णय देताना राज्यातील सर्व रेतीघाट ११ जूनपर्यंत बंद करण्याचे आदेश देण्यात आलेत़ यामुळे वर्धा जिल्ह्यातील लिलाव झालेल्या २१ घाटांवर संक्रांत आली आहे़ सर्व घाट बंद करण्याचे आदेश असताना पुलगाव लगतच्या गुंजखेडा घाटावर रेतीची अवैधरित्या लयलूटच केली जात आहे़ मजुरांकरवी दिवसाढवळ्या ढीग केलेली रेती ट्रॅक्टरद्वारे सर्रास वाहून नेली जात आहे़ महसूल प्रशासनासह पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते़ राज्यातील लिलाव करण्यात आलेल्या कुठल्याही घाटाचा मायनिंग प्लान सादर करण्यात आलेला नाही़ याबाबत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती़ या याचिकेवर निर्णय देत न्यायाधीशांनी ११ जूनपर्यंत राज्यातील सर्व घाट बंद करण्याचे आदेश दिले आहेत़ शिवाय रेतीघाट धारकांनी मायनिंग प्लान सादर करावेत आणि त्यानंतर रेतीचा उपसा करावा, असे आदेशित केले आहे़ याचा फटका जिल्ह्यातील घाट धारकांनाही बसला आहे़ जिल्ह्यातील लिलाव झालेले संपूर्ण २१ घाट बंद करण्यात आले आहेत़ घाट बंद केल्याने रेतीचा उपसा, वाहतूक करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही; पण जिल्ह्यात सर्रास रेतीची चोरी, साठवणूक आणि वाहतूक केली जात असल्याचे दिसून येत आहे़ पुलगाव नजीकच्या गुंजखेडा रेती घाटामध्ये तर रेती माफीयांनी अधिकृत रस्त्याचीच निर्मिती केली आहे़ वाळू उपस्याच्या स्थळापर्यंत जड वाहने नेली जातात़ सध्या गुंजखेडा घाटावरून २५ ते ३० मजुरांकरवी पात्रातून रेतीचा उपसा केला जात आहे़ काढलेली रेती हे मजूर रस्त्याच्या कडेला ढीग मांडून ठेवतात़ यानंतर एकाच वेळी आलेल्या ट्रॅक्टरमध्ये ही संपूर्ण रेती भरली जाते़ यात ट्रक्टर मालकांमध्ये वाद होत असल्याचेही समोर आले आहे़ गत काही दिवसांपासून सुरू असलेला हा रेतीचोरीचा प्रकार प्रशासनाच्या डोळ्यादेखत होत असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे़ दिवस निघताच गुंजखेडा रेती घाटातून रेती काढण्याची प्रक्रिया सुरू होते़ यानंतर ट्रॅक्टर दाखल होताच वादाला तोंड फुटते़ या प्रकारात एखाद्याचा बळी जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे़ या रेती घाटांवर अधिकारी, कर्मचारीही एकटे फिरकू शकत नाहीत़ रेतीमाफीया कर्मचार्यांवर हल्ले करण्यासही मागेपूढे पाहत नाही़ यामुळे अधिकार्यांचे आदेश असले तरी तलाठी एकटे घाटाकडे भटकत नाहीत़ शिवाय काही कर्मचारीच रेतीमाफीयाला माहिती पूरवित असल्याचेही समोर आले आहे़ अवैध रेतीचोरीचा प्रकार संपूर्ण जिल्ह्यात आता राजरोसपणे सुरू झाला आहे़ प्रशासनाने याकडे पाठ फिरविल्याने रेतीचोरांचे फावल्याचेच दिसते़(कार्यालय प्रतिनिधी)