बनावट कागदपत्रावर सिमकार्ड घेवून अवैध व्यवसाय
By Admin | Updated: May 11, 2014 00:31 IST2014-05-11T00:31:24+5:302014-05-11T00:31:24+5:30
बनावट ओळखपत्राच्या आधारे सिमकार्ड खरेदी करून त्याचा वापर अवैध व्यवसायाकरिता करून ओळखपत्र धारकाची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलीस ....

बनावट कागदपत्रावर सिमकार्ड घेवून अवैध व्यवसाय
वर्धा : बनावट ओळखपत्राच्या आधारे सिमकार्ड खरेदी करून त्याचा वापर अवैध व्यवसायाकरिता करून ओळखपत्र धारकाची फसवणूक केल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात शनिवारी नोंदविण्यात आली. अमित प्रमोद किटे (२६) रा. विठ्ठल मंदिर जवळ याने दिलेल्या तक्रारीवरून सुशील भगत नामक युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सुत्रांनुसार, अमितचे छायाचित्र असलेल्या ओळखपत्राच्या आधारे बनावट कागदपत्र तयार करून सिमकार्ड खरेदी केले. या सिमचा वापर सुशील जुगारासारख्या अवैध कामाकरिता करीत आहे. सुशील सिम क्रं. ७४४०१६२६७ च्या आधारे जुगार खेळत असल्याची माहिती अमितला मिळाली. त्याने याचा शोध घेतला असता सदर सिमकार्ड सुशील भगत नामक युवकाकडे असल्याचे कळले. सुशीलने अमितची फसवणूक करून अवैध व्यवसाय केल्याने अमित गुन्ह्यात अडकण्याची भीती असल्याने त्याने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून भांदवि कलम ४७१, ४६८, ४२० अन्वये गुन्हा दाखल आहे. (स्थानिक प्रतिनिधी)