अंतरगावातील ‘त्या’ रोहित्राकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: August 18, 2014 23:39 IST2014-08-18T23:39:58+5:302014-08-18T23:39:58+5:30
सेलूपासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या व रेहकी वीज वितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या अंतरगाव येथील रोहित्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे़ शेतात तारा लोंबकळत असून रोहित्र

अंतरगावातील ‘त्या’ रोहित्राकडे दुर्लक्ष
घोराड : सेलूपासून अवघ्या सहा किमी अंतरावर असलेल्या व रेहकी वीज वितरण कार्यालयांतर्गत येणाऱ्या अंतरगाव येथील रोहित्र शेतकऱ्यांच्या जीवावर उठले आहे़ शेतात तारा लोंबकळत असून रोहित्र सताड उघडे आहे़ यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे़ वीज कंपनीने या अनागोंदीकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़
अंतरगावनजीक राऊत यांचे शेत आहे़ भंगार अवस्थेत असलेल्या या रोहित्रावरून गावाला व कृषी पंपांना वीज पुरवठा केला जातो. या भंगार व उघड्या रोहित्राबाबत शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी रेहकी येथील सहायक अभियंत्यांकडे केल्यात; पण त्या तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली़ याच रोहित्रावरून समोर गेलेल्या विद्युत प्रवाहाच्या तारा शेतात लोंबकळत आहे़ या तारांना कधी हात लागेल, हे सांगता येत नाही़ येथे कार्यरत लाईनमन सहा महिन्यांपूर्वी निवृत्त झाले़ त्यांच्या रिक्त जागेवर अतिरिक्त लाईनमनही दिला; पण ते अनुपस्थित असतात़ वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढले असून ग्रामस्थांना कधीकाळी रात्र अंधारात काढावी लागते. लाईनमन राहत नसल्याने या रोहित्रावर फ्युज टाकणे तारेवरची कसरत असते़ शिवाय रोहित्रातील फ्युजला लाकडी फळीचा टेकू लावून आधार द्यावा लागत आहे. रेहकीपासून अंतरगाव पाच किमी असून सहायक अभियंत्याचा पदभार पवनार येथील सहायक अभियंताकडे आहे़ यामुळे ते पावनारवरून अंतरगाव या १३ किमी लांब गावाचा कारभार सांभाळतात़ यामुळे रेहकीला पूर्णवेळ सहायक अभियंता द्यावा, अशी मागणी होत आहे़ शिवाय उघडे असलेले भंगार रोहित्र त्वरित दुरूस्त करून तारा व्यवस्थित कराव्या, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)