पोलीस कंट्राेल रूमला ‘फेक कॉल’ केल्यास आता खैर नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST2021-08-06T05:00:00+5:302021-08-06T05:00:28+5:30
नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी २४ तास कर्तव्य पार पाडतात. मात्र, काहींकडून विनाकारण केवळ पोलिसांची मजा घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. माझी मुलगी खूप त्रास देते, पती दारू पितो, त्याला समजवा; इतकेच नव्हे तर काही मद्यधुंद लोक विनाकारण १०० क्रमांकावर कॉल करून पोलिसांना त्रास देत असल्याने नियंत्रण कक्षातील पोलिसांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे.

पोलीस कंट्राेल रूमला ‘फेक कॉल’ केल्यास आता खैर नाही !
चैतन्य जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘हॅलो पोलीस कंट्राेल रूम... अमुक ठिकाणी खून झाला... मारहाणीच्या घटना घडल्या... दारू पिऊन शिवीगाळ सुरू आहे... काही युवक चाकू, तलवारी घेऊन उभे आहेत...’ असे सांगितले जाते. घटनेचे गांभीर्य ओळखून पटकन कंट्राेल रूममधून संबंधित पोलीस ठाण्याला वायरलेसवरून संदेश दिला जातो... पोलिसांची धावपळ होते... घटनास्थळी पोलीस पोहोचल्यावर मात्र, ‘फेक कॉल’ असल्याचे समजताच पोलिसांना रिकाम्या हाती परतावे लागते... मात्र, आता पोलिसांना फेक कॉल केल्यास कठोर कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस नियंत्रण कक्षातील १०० क्रमांकावर तसेच इतर लँडलाईन क्रमांकावर मागील काही महिन्यांपासून ‘फेक कॉल्स’ येत आहेत.
नियंत्रण कक्षातील महिला कर्मचारी २४ तास कर्तव्य पार पाडतात. मात्र, काहींकडून विनाकारण केवळ पोलिसांची मजा घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना त्रास देण्याचे काम केले जात आहे. माझी मुलगी खूप त्रास देते, पती दारू पितो, त्याला समजवा; इतकेच नव्हे तर काही मद्यधुंद लोक विनाकारण १०० क्रमांकावर कॉल करून पोलिसांना त्रास देत असल्याने नियंत्रण कक्षातील पोलिसांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे.
अनेकदा केवळ गंमत म्हणून पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल लावण्यात येतो. घटना घडल्याची खोटी माहिती देण्यात येते.
पोलीस तातडीने घटनास्थळावर जातात. तेव्हा तेथे शांतता असते. फोन करणारी व्यक्तीही हजर नसते.
पोलिसांना केवळ त्रस्त करण्यासाठी काहीजण कॉल करीत असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे आता फेक कॉल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. फेक कॉल करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. जेणेकरून पोलिसांची कुणीही टिंगलटवाळी करण्याची हिंमत करणार नाही, अशांवर कठोर कारवाई होणार असल्याचे पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांनी सांगितले.
८ अधिकारी, ९ महिला कर्मचारी २४ तास ऑन ड्यूटी
पोलीस अधीक्षक कार्यालयात असलेल्या नियंत्रण कक्षात पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत किचक, सचिन राखुंडे, पोलीस उपनिरीक्षक दीपक मुरारकर, दिलीप ताटे, बापूराव बावणकर, राजेंद्र ठाकरे, राजेंद्र जंगीतवार तसेच ९ महिला पोलीस कर्मचारी ऑन ड्यूटी २४ तास कार्यरत असतात. कुठेही घटना घडली, काही अपरिमित घडल्यास थेट यांच्याकडून संबंधित पोलीस ठाण्याला माहिती दिली जाते.
अनेकदा अर्वाच्च बोलण्याचा करावा लागतो सामना
पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांना अनेकदा मद्यप्यांकडून विनाकारण वारंवार फोन करून मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. इतकेच नव्हे तर मद्यप्यांकडून अर्वाच्च बोलणेदेखील सहन करावे लागते. विनाकारण फोन करू नका, असे अनेकदा सांगितल्यावरही त्यांचे कॉल करणे बंद होत नाही; त्यामुळे महिला कर्मचारीही ‘फेक कॉल’मुळे त्रस्त झाल्या आहेत.
पोलीस कंट्राेल रूमला फेक कॉल करून त्रस्त करीत असतील तर अशांची माहिती घेतली जाईल. फेक कॉल केल्यामुळे संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागते. परंतु, हाती काहीच लागत नाही. त्यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो. त्यामुळे फेक कॉल करणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अशांवर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे.
- प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.