'दुसरीकडे लग्न करशील तर तुला व घरच्यांना ठार मारेन'... प्रेयसीने ‘ब्लॅकमेल’ केल्याने प्रियकराने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 21:45 IST2022-06-02T21:42:48+5:302022-06-02T21:45:18+5:30
Wardha News दुसऱ्या मुलीशी लग्न करशील तर तुला व घरच्यांना ठार मारेल अशा प्रेयसीने दिलेल्या धमक्यांपायी त्रस्त झालेल्या एका युवकाने गळफास लावून जीव दिल्याची घटना वर्धा जिल्ह्यात घडली.

'दुसरीकडे लग्न करशील तर तुला व घरच्यांना ठार मारेन'... प्रेयसीने ‘ब्लॅकमेल’ केल्याने प्रियकराने घेतला गळफास
वर्धा : तुझे लग्न दुसरीकडे कसे होते... तुला व तुझ्या कुटुंबीयाला ठार मारेन... अशी धमकी प्रेयसीकडून व तिच्या सहकाऱ्याकडून मिळत होती, याच सततच्या जाचाला कंटाळून आशिष नरेश भोपळे, रा. विरुळ आकाजी याने मांडवा शिवारात असलेल्या नाल्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले.
मृताची आई सुनंदा नरेश भोपळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंगी पोलिसांनी दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली. मृत आशिष भोपळे आणि आरोपी पारबता कुंभेकर, रा. कृष्णापूर, ता. आर्वी यांचे प्रेमसंबंध होते. मात्र, पारबता ही सहकारी तिलक साटोणे याच्यासोबत मिळून आशिषला नेहमी त्रास द्यायची. तुझे लग्न कसे होते मी बघतो, अशी धमकी देऊन वारंवार पैशाची मागणी करून आशिषकडून तब्बल दोन लाख रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यास तुला व तुझ्या कुटुंबीयांना जिवे ठार मारून तुला पोलीस केसमध्ये फसवीन, अशी धमकी देऊ लागले.
प्रेयसी आणि तिच्या मित्राच्या सततच्या तगाद्यामुळे हताश आणि निराश झालेल्या आशिष भोपळे याने मांडवा शिवारात एका नाल्यातील झाडाला गळफास घेत आत्महत्या करून जीवन संपविले. त्याच्याजवळील चिठ्ठीत त्याने हे सर्व नमूद केल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आल्याने मृत आशिषची आई सुनंदा भोपळे यांनी सावंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी पारबता कुंभेकर आणि तिलक साटोणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.