असुविधांच्या छायेत बारावीची परीक्षा
By Admin | Updated: February 25, 2015 01:59 IST2015-02-25T01:59:09+5:302015-02-25T01:59:09+5:30
परीक्षा केंद्रावर गेलेल्या परीक्षार्थ्यांना सर्वच सुविधा पुरविण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र वर्धेत काही परीक्षाकेंद्रांवर या सुविधांना बगल देण्यात आल्याचे वास्तव आहे.

असुविधांच्या छायेत बारावीची परीक्षा
वर्धा लोकमत चमू
परीक्षा केंद्रावर गेलेल्या परीक्षार्थ्यांना सर्वच सुविधा पुरविण्याचे शासनाचे आदेश आहेत; मात्र वर्धेत काही परीक्षाकेंद्रांवर या सुविधांना बगल देण्यात आल्याचे वास्तव आहे. केंद्रावर परीक्षा देण्याकरिता गेलेल्यांना असुविधांचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. ‘लोकमत’ ने मंगळवारी जिल्ह्यातील आठ तालुक्यातील काही शाळांचे ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. यात बऱ्याच शाळेत खिडक्यांना दारे नाही तर काही शाळांत परीक्षा असलेल्या कक्षात इतर साहित्य ठेवून असल्याचे सामोर आले. कुठे पंखे नाहीत तर कुठे शासनाच्या आदेशाला डावलून वीज पुरवठा खंडीत झाल्यास पर्यायी व्यवस्था करण्यात आले नसल्याचे समोर आहे. शिक्षण विभागाने जिल्ह्यात सुविधा नसलेल्या चार शाळांना सूचना केल्याची माहिती आहे.
भविष्याला कलाटणी देणाऱ्या उच्च माध्यमिक परीक्षेत जिल्ह्यातील १८ हजार ४३ विद्यार्थी सहभागी झाले आहेत. त्यांच्याकरिता जिल्ह्यात एकूण ४४ परीक्षा केंद्र तयार करण्यात आले आहेत. यापैकी काही केंद्रांची पाहणी केली असता त्यात सुविधांची वाणवा असल्याचे समोर आले आहे.
शहरातील परीक्षा केंद्र वगळता एकाही केंद्रावर विद्यार्थ्यांकरिता पूर्ण सुविधा नसल्याचे दिसून आले. शहरातील शाळांत जनित्र नसले तरी इन्व्हर्टर असल्याची माहिती शाळांच्यावतीने देण्यात आली. यावर परीक्षा असलेल्या खोलीत पंखे सुरू ठेवता येत असल्याचे सांगण्यात आले; मात्र ग्रामीण भागातील केंद्रावर कुठलीही सुविधा नसल्याचे दिसून आले. सर्वाधिक बिकट स्थिती समुद्रपूर तालुक्यात असल्याचे समोर आले. येथील विकास विद्यालयातील काही खोल्यांत इतर साहित्य ठेवून असल्याचे दिसून आले. तर पुलगाव येथील आदर्श हायस्कूल या परीक्षा केंद्रावर खिडक्यांना पल्लेच नाही तर सळाखीही नसल्याचे समोर आले. परीक्षार्थ्यांना पिण्याचे पाणी पुरविण्याकरिता असलेल्या ठिकाणी अस्वच्छतेचा कळस असल्याचे आहे. कानगाव येथील विकास महाविद्यालय या परीक्षा केंद्रात विजेची सोय असली तरी वर्गात पंखेच नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे भर उन्हाच्या दिवसात विद्यार्थ्यांना घाम गाळत परीक्षा देण्याची वेळ आली आहे.