भाजीच्या देयकावर वाणाचा उल्लेख नाही : उसणवार रकमेची परस्पर विल्हेवाटरूपेश खैरी। लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शिक्षणाची सोय नसलेल्या भागातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहांत होणारा खर्च कुठल्याही पक्क्या देयकाशिवाय मंजूर करण्यात आल्याचा अजब प्रकार जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने केला आहे. शिवाय वसतिगृहातून सादर करण्यात आलेल्या देयकांचा कुठलाही हिशेब येथे जुळत नसल्याचेही समोर आले आहे. मागासवर्गीय मुलांकरिता असलेल्या वसतिगृहात वास्तव्यास असलेल्या मुलांना सर्व सोयी मिळाव्या याकरिता शासनाकडून विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. या अनुदानाचा लाभ घेण्याकरिता वसतिगृहाच्या व्यवस्थापकांनी झालेल्या खर्चाचे विवरण पक्क्या देयकांसह आणि विशेष लेख्यांसह सादर करणे गरजेचे असते; पण येथे सादर करण्यात आलेल्या काही देयकांत तर नेमका खर्च कशावर झाला, याचाच उल्लेख नसल्याचे दिसून आले आहे. आंजी (मोठी) येथील एका वसतिगृहाच्यावतीने ‘भाजीपाला’, असे देयक सादर करण्यात आले आहे. या देयकात भाजीच्या कुठल्याही प्रकाराचा उल्लेख करण्यात आला नसल्याचे दिसून आले आहे. असे एकच नव्हे तर अनेक प्रकार घडल्याचेही दिसून आले आहे. एका वसतिगृहामध्ये तर जमा-खर्चाच्या नोंदी तारखेवार नसून ‘एका तारखेपासून दुसऱ्या तारखेपर्यंत’, असे नमूद करण्यात आले आहे. असे असतानाही या वसतिगृहांना अनुदान मंजूर करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. काही वसतिगृहांनी उसणवार रक्कम दाखविली आहे. ही उसणवार रक्कम बँकेत जमा करून खर्च करणे आवश्यक होते; पण येथे तसे झाले नाही. अग्रीम रक्कम घेऊन ती बँकेत जमा न करता परस्पर खर्च केल्याची प्रकरणेही समोर आली आहेत. असे एक ना अनेक घोळ समाजकल्याण विभागाच्यावतीने झाल्याचे समोर येत आहे.
पक्के देयक नसताना वसतिगृहाला निधी
By admin | Updated: June 23, 2017 01:36 IST