पाच वर्षांत ३०० वर फळबागा

By Admin | Updated: March 31, 2017 01:55 IST2017-03-31T01:55:15+5:302017-03-31T01:55:15+5:30

केळी बागायतदारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलू तालुक्यात केळीच्या बागा नामशेष होत आहे.

Horticulture at 300 in five years | पाच वर्षांत ३०० वर फळबागा

पाच वर्षांत ३०० वर फळबागा

शेतकऱ्यांचा कल फळबाग लागवडीकडे : तालुक्यातील केळीच्या बागा मात्र नाममात्र
विजय माहुरे   घोराड
केळी बागायतदारांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या सेलू तालुक्यात केळीच्या बागा नामशेष होत आहे. असे असले तरी तालुक्यातील शेतकरी फळबाग लागवडीकडे वळले आहेत. परिणामी, मागील पाच वर्षांत ३०० च्या वर फळबागा तालुक्यात बहरल्या आहेत.
बारमाही ओलिताची शेती असलेल्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीचे उत्पादन घेतले जात होते. महागडा खर्च, १८ महिन्यांचे पीक आणि अल्प भाव पाहता मागील दहा वर्षांमध्ये केळीच्या बागा नामशेष होत आहेत. असे असले तरी पाच वर्षांमध्ये शासनाच्या सिंचन व धडक विहीर योजनेचा लाभ मिळालेले शेतकरी बागायती शेती करण्याकडेच वळत असल्याचे दिसते. यामुळेच शासनाने फळबाग योजना सुरू केली. यात निंबु, संत्रा, मोसंबी, डाळींब या फळांचा समावेश होता. २०१२-१३ पासून ही योजना आजही सुरू आहे. यासाठी शासन तीन वर्षांपर्यंत अनुदान देते. फळबागेसाठी रोपटे शेतात लावल्यानंतर ३ ते ५ वर्षांपर्यंत आंतर पीक घेता येत असल्याने शेतकऱ्यांना परवडणारी शेती करता येते. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेत फळबागा फुलविल्या आहेत. प्रारंभी लावलेल्या फळबागांपासून उत्पन्न मिळण्यास सुरुवातही झाली आहे. शेतकऱ्यांचा कल फळबागांकडे असल्याने पं.स. कृषी विभागात ते योजनांची माहिती घेताना दिसतात. पारंपरिक शेती करणारा शेतकरी खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याने आर्थिक सुबत्तेसाठी जोडधंदा करतात; पण तरी कर्जातच जगतात. यामुळेही तरूण शेतकरी शेती हा व्यवसाय समजून करीत असून फळबाग, फुलशेतीकडे वळलेत. यात शेडनेट व अन्य नव्या तंत्रज्ञानाची भर पडली आहे. केळीच्या बागा नामशेष झाल्या असल्या तरी फळबागांच्या माध्यमातून बागायती तालुका म्हणून गतवैभव प्राप्त होण्यास वाव आहे.

Web Title: Horticulture at 300 in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.