हिंगणघाटकर ठाण्यावर धडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 05:00 IST2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:32+5:30
हिंगणघाट शहराचे हृदयस्थान असलेल्या नंदोरी चौक परिसरात महाविद्यालयात जात असलेल्या एका प्राध्यापिकेला आरोपी विकेश नगराळे याने वाटेत अडविले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने स्वत: जवळील पेट्रोल त्या प्राध्यापिकेच्या अंगावर टाकून तिला आगीच्या हवाली केले. या घटनेत पीडिता ही सुमारे ४० टक्के भाजली गेली.

हिंगणघाटकर ठाण्यावर धडकले
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : तालुक्यातील अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील रहिवासी असलेल्या प्राध्यापिकेला हिंगणघाट शहरात पेट्रोल टाकून आगीच्या हवाली करीत जीवानिशी ठार करण्याचा प्रयत्न विकेश नगराळे नामक इलेक्ट्रीशीयनने केला. या प्रकरणातील आरोपील हिंगणघाट पोलिसांनी अटक केली असली तरी त्याने केलेले कृत्य निंदनिय आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी हिंगणघाटकरांनी एकत्र येत मोर्चा काढून हिंगणघाट पोलीस ठाण्यावर धडक दिली. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन ठाणेदार सत्यजीत बंडीवार यांना सादर करण्यात आले.
हिंगणघाट शहराचे हृदयस्थान असलेल्या नंदोरी चौक परिसरात महाविद्यालयात जात असलेल्या एका प्राध्यापिकेला आरोपी विकेश नगराळे याने वाटेत अडविले. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने स्वत: जवळील पेट्रोल त्या प्राध्यापिकेच्या अंगावर टाकून तिला आगीच्या हवाली केले. या घटनेत पीडिता ही सुमारे ४० टक्के भाजली गेली. पीडितेला आगीच्या हवाली केल्यानंतर घटनास्थळावरून यशस्वी पळ काढणाऱ्या आरोपी विकेश नगराळे याला हिंगणघाट पोलिसांनी नागपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. परंतु, त्याने केलेले हे कृत्यू माणुसकीलाच लाजवेल असे असल्याने त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ठाणेदारांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. मोर्चाच्या माध्यमातून विकृत मानसिकतेचा निषेध आंदोलनकर्त्यांनी केला. शिवाय हैद्राबाद येथील घटनेतील आरोपीचा जसा एन्काऊंटर करण्यात आला तसाच याही आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी रेटली. या आंदोलनाचे नेतृत्त्व मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी केले. मोर्चात मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अत्याचारमुक्ती संघर्ष समितीचे एसडीओंना साकडे
हिंगणघाट येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवित आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी विदर्भ प्रदेश जेष्ठ नागरिक व निराधारांचे अत्याचारमुक्ती संघर्ष समितीच्यावतीने उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना आशा कापटे, नलीनी महाजन, सुमन खाटे, कमला पाथर, इंदिरा पर्बत, सुनंदा भोयर, सुमन धाबर्डे, गीता कोटकर, शेषराव लोणकर, तुकाराम कोल्हे, गुड्डु शर्मा, विद्या गिरी, दागिणी गिरी, मंगला वंजारी, रागिणी शेंडे आदींची उपस्थिती होती.
जखमीचे बयाण नोंदविण्यात अडचण
या प्रकरणातील आरोपीला हिंगणघाट पोलिसांनी जेरबंद केले आहे. शिवाय गंभीर जखमी प्राध्यापिकेवर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमीची प्रकृती अजूनही स्थिर झाली नसल्याने पोलिसांनाही तिचे बयाण नोंदविण्यासाठी प्रतीक्षाच करावी लागत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत जखमीचे बयाण नोंदविण्यात आले नव्हते.