हिंगणा-हिंगणघाट मार्ग जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST2019-11-26T05:00:00+5:302019-11-26T05:00:29+5:30
रात्रीचे खोदकाम केले जात असल्याने सूचना फलकाअभावी हे खोदकाम आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. चार दिवसांत दोघांचे अपघात झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा वाढत असल्याने नागरिकाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

हिंगणा-हिंगणघाट मार्ग जीवघेणा
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणी : हिंगणा ते हिंगणघाट मार्गाचे काम संथगतीने सुरु असून या बांधकामादरम्यान कंत्राटदाराने कुठलेही सूचना फलक लावले नाही. मार्गावर रात्रीचे खोदकाम केले जात असल्याने सूचना फलकाअभावी हे खोदकाम आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. चार दिवसांत दोघांचे अपघात झाले असून दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा वाढत असल्याने नागरिकाकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
हिंगणा ते हिंगणघाट या मार्गाचे काम सुरु झाले असून या मार्गादरम्यानच्या हिंगणी ते सेलू पर्यंतच्या मार्गाची पूर्णत: चाळणी झाली आहे. या मार्गावरुन वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. तरीही कामाची गती मंदच असल्याने हे बांधकाम आता जीवघेणे ठरत आहे. मार्गाच्या रुंदिकरणासोबतच दोन्ही बाजुला सिमेंटच्या नाल्या करण्यासाठी खोदकाम करण्यात आले. तसेच मार्गावरही भरावा टाकण्याकरिता खोदकाम करण्यात आले. मार्गाचे काम सुरु असल्याने बांधकामासंदर्भात सूचना फलक लावणे बंधनकारक आहे.
मात्र कंत्राटदाराने कुठेही सूचना फलक लावले नसल्याने नागरिकांची वाहने खड्डयात शिरुन अपघात होत आहे. दोन दिवसापूर्वी हिंगणी येथील राकेश पोकळे हे सेलू येथून हिंंगणीला येत होते. रात्री १ वाजताच्या सुमारास किन्ही गावानजीक खोदण्यात आलेल्या नालीच्या खड्डयात त्यांची दुचाकी गेली.
या ठिकाणी सूचना फलक नसल्याने हा अपघात झाला असून त्यांनी किन्ही येथील अमर धोटे यांनी सेलुच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता सेवाग्रामला हलविण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शनिवारी रात्री गणेश खडगी हे सेलू येथून हिंगणीला जात होते. त्यांचाही याच मार्गावर सूचना फलका अभावी अपघात झाला. तेही जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. जिल्ह्यातील अनेक रस्त्यामध्ये नागरिकांशी दिशादर्शक फलकाच्या अभावामुळे अनेकांची दिशाभूल होत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, नागरिकांमध्ये वाढतोय रोष
हा मार्ग वर्दळीचा असल्याने या मार्गावर ग्रामीण भागातील नागरिकांची दिवसरात्र वर्दळ असते. त्यामुळे बांधकामादरम्यान कंत्राटदाराने सूचना फलक लावणे आवश्यक आहे. सकाळी मोकळ्या असलेल्या मार्गावर रात्री खड्डा केला जात असल्याने वाहनचालकांनाही या मार्गाचा अंदाज येत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. तरीही कंत्राटदाराकडून खबरदारी घेतली जात नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.
कंत्राटराच्या या मनमर्जी कारभाराकडे संबंधित विभागाचेही दुर्लक्ष असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे तत्काळ या मार्गावर सूचना फलक लावण्याची मागणी होत आहे.