हे राम...! काँग्रेस नेत्यांकरिता ‘बापू’ केवळ नावापुरतेच?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST2021-10-03T05:00:00+5:302021-10-03T05:00:33+5:30
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. यात काँग्रेसच्यावतीनेही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे गांधी जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम परिसरात काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आजी-माजी व पदाधिकारी उपस्थित राहून आदरांजली अर्पण करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. लहान-मोठे कार्यक्रम आणि विविध बैठकांसाठी सतत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे पालकमंत्रीही आज सेवाग्राम आश्रमात दिसले नाहीत.

हे राम...! काँग्रेस नेत्यांकरिता ‘बापू’ केवळ नावापुरतेच?
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनामित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सेवाग्राम आश्रम परिसरात अखंड सूत्रयज्ञ, सामूहिक प्रार्थना आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पण, या दिवसभराच्या कार्यक्रमादरम्यान जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपासून काँग्रेसचे आजी-माजी आमदार तसेच पदाधिकारीही आश्रमाकडे भटकलेच नाहीत. त्यामुळे ‘काँग्रेस नेत्यांकरिता ‘बापू’ केवळ नावापुरतेच?’ अशी चर्चा रंगली होती.
देशभरात स्वातंत्र्यदिनाचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात राबविला जात आहे. यात काँग्रेसच्यावतीनेही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे गांधी जयंतीदिनी सेवाग्राम आश्रम परिसरात काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, आजी-माजी व पदाधिकारी उपस्थित राहून आदरांजली अर्पण करतील, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. लहान-मोठे कार्यक्रम आणि विविध बैठकांसाठी सतत जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणारे पालकमंत्रीही आज सेवाग्राम आश्रमात दिसले नाहीत. इतकेच नाही तर जिल्ह्यातील काँग्रेसचे आजी-माजी आमदार, पदाधिकारी ही सेवाग्राम आश्रमाकडे फिरकले नाही. आश्रमात पहाटे रामधुनीपासून सुरू झालेल्या कार्यक्रमाची सायंकाळी सामूहिक प्रार्थनेनंतर सांगता करण्यात आली. पण, या कालावधीत काँग्रेसचे कोणतेही नेते आले नाहीत. त्यामुळे ‘काँग्रेसकडून गांधींचा राजकारणासाठीच वापर होतो’ असा विरोधकांचा रोख आणखीच भक्कम झाला. यासंदर्भात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनाेज चांदुरकर यांना विचारले असता पदाधिकाऱ्यांसह आश्रमात होतो, असे सांगितले.
भाजपच्या मंडळींची होती उपस्थिती...
- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुपारी सेवाग्राम आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केल्याने त्यांच्यामुळे का होईना खासदार रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे यांच्यासह इतरही भाजपाचे पदाधिकारी आश्रमात उपस्थित झाले होते. त्यांनी बापूकुटीत आदरांजलीही वाहिली. तसेच माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. शिरिष गोडे यांनीही आश्रमाला भेट देऊन प्रार्थना केली.