हरभऱ्याचा ढीग पेटविला; अडीच लाखाचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:06 IST2019-03-07T00:04:35+5:302019-03-07T00:06:13+5:30
नजीकच्या कोळोणा (चोरे) येथील बबन कडू यांच्या शेतातील हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीत कडू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.

हरभऱ्याचा ढीग पेटविला; अडीच लाखाचे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : नजीकच्या कोळोणा (चोरे) येथील बबन कडू यांच्या शेतातील हरभऱ्याच्या ढिगाला अज्ञात व्यक्तीकडून लावलेल्या आगीत कडू यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी ९.३० वाजताच्या सुमारास घडली असून शेतकऱ्याचे सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
गावापासून काही अंतरावर असलेल्या सुरेंद्र चोरे यांचे शेत बबन कडू हे मक्त्याने करीत आहे. याही वर्षी त्यांनी शेत मक्त्याने केले असून खरीप पीक सोयाबीन घेतले व रबी पीक म्हणून हरभरा पेरला होता. हे पीक एक-दोन दिवसांपूर्वी कापणी करून शेताच्या मध्यभागी ढीग मारून ठेवण्यात आले होते. पण, अज्ञात माथेफिरूने रात्रीला शेतात येऊन हरभऱ्याच्या ढिगाला पेटवून दिले. आगीचे लोळ दिसत असल्याने त्या दिशेने नागरिकांनी धाव घेतली; पण तोपर्यंत जळून सर्वकाही कोळसा झाले होते. हरभºयाचा ढिग जळाल्याने बबन कडू या शेतकऱ्याचे जवळपास दोन ते अडीच लाखाचे नुकसान झाले आहे. माहिती मिळताच देवळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर
निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्वीच शेतकरी हवालदिल झाला आहे. अशातच सुड घेण्याच्या भावनेतून शेतात ठेवलेल्या शेतमालाला आगी लावल्या जात आहे. त्यामुळे हवालदिल शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे.