आरोग्य सेवेकरिता करावी लागते १० किमीची पायपीट
By Admin | Updated: February 9, 2015 23:19 IST2015-02-09T23:19:39+5:302015-02-09T23:19:39+5:30
बोर व्याघ्र प्रकल्प परिसरातील नागरिकांना १० कि.मी.चे अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. व्याघ्र प्रकल्पाची सीमा अवघ्या दोन किमीवर असताना कोणतीही दुर्घटना झाल्यास

आरोग्य सेवेकरिता करावी लागते १० किमीची पायपीट
बोरधरण : बोर व्याघ्र प्रकल्प परिसरातील नागरिकांना १० कि.मी.चे अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. व्याघ्र प्रकल्पाची सीमा अवघ्या दोन किमीवर असताना कोणतीही दुर्घटना झाल्यास नागरिकांना सेलू येथे जाण्याखेरीज गत्यंतर नसते.
हिंगणी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावे, अशी मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत अद्याप कोणतीच पावले उचलण्यात आलेली नाही. यामुळे नागरिकांना १० किमी अंतर पार करून आरोग्य सेवा घ्यावी लागत आहे. हिंगणी ग्रामपंचायत अंतर्गत धामणगाव, शिवणगाव, वानरविहरा, देवनगर या गावांचा समावश होतो. तर एक किमी अंतरावर असलेल्या किन्ही, मोही, ब्राह्मणी या गावाचा यात समावेश आहे. शासनाने येथे अॅलोपॅथिक दवाखाना सुरू केला आहे. परंतु उपचार करून घेण्यासाठी सेलू येथे ग्रामीण रूग्णालयात जाण्याखेरीज पर्याय नसतो.
जंगलव्याप्त भागात असलेल्या सालई (कला) येथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. मात्र या गावातील नागरिकांना सालई येथे जाऊन उपचार घेणे शक्य होत नाही. हिंगणी गावापासून दोन कि.मी अंतरानंतर व्याघ्र प्रकल्प सुरू होतो. या परिसरात हिंसक श्वापदांचा सातत्याने वावर असतो. अनेकदा जंगली श्वापदांकडून मानव व पशुंवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. बोर अभयारण्याकडे जाण्याकरिता हाच मार्ग आहे. पर्यटन स्थळाकरिता बोर गावावरून मार्ग जात असून किरकोळ अपघात होतात. अशा स्थितीत जखमींना सेलू येथे नेऊनच उपचार करावे लागतात. सेलू येथील ग्रामीण रूग्णालयाचे बोरधरण येथून १५ किमी आहे. ग्रामीण भागातील रूग्णांना उपचार करून घेणे अवघड जाते. नाहक आर्थिक भुर्दंड व प्रवासाचा भार सहन करावा लागत आहे. याची दखल घेण्याची मागणी होत आहे.(वार्ताहर)