‘त्या’ इसमाची हत्याच
By Admin | Updated: July 20, 2015 02:02 IST2015-07-20T02:02:29+5:302015-07-20T02:02:29+5:30
रायपूर येथील हनुमंत जानराव मोहदुरे (४०) यांचा मृतदेह एका शेतातील शेततळ्यात आढळला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण येत आहे.

‘त्या’ इसमाची हत्याच
दोघांना अटक : शेततळ्यात आढळला होता मृतदेह
आकोली : रायपूर येथील हनुमंत जानराव मोहदुरे (४०) यांचा मृतदेह एका शेतातील शेततळ्यात आढळला होता. या प्रकरणाला आता वेगळे वळण येत आहे. हनुमंतची हत्या केल्याचे समोर आले असून सेलू पोलिसांनी या प्रकरणी दोघांना रविवारी अटक केली आहे; मात्र त्याची हत्या कोणत्या कारणाने झाली याचा उलगडा झाला नाही.
प्रशांत सावरकर, रा. आमगाव आणि काशीनाथ मडावी रा. रायपूर अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोघांनी हत्येची कबुलीही दिली आहे. शिवाय हनुमंतचा मृतदेह आढळण्यापूर्वी तो या दोघांसोबत गेल्याची तक्रार हनुमंतच्या पत्नीने पोलिसात केली होती.
पोलीस सुत्रानुसार, हनुमंत याला जडीबुटीची बऱ्यापैकी माहिती होती. त्यामुळे प्रशांत सावरकर, रा. आमगाव आणि काशीनाथ मडावी रा. रायपूर या दोघांनी गायीचा पाय मोडला असून उपचारासाठी त्याला सोबत नेले होते. तेव्हापासून हनुमंत बेपत्ता होता. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना गत रविवारी (दि.५) त्याचा मृतदेहच रायपूर येथील हरिकिसन भुजाडे यांच्या शेतातील शेततळ्यात आढळला होता. याप्रकरणी मृतकाच्या पत्नीने प्रशांत आणि काशीनाथ विरूद्ध तक्रार दाखल केली होती. घटनेचा तपास सेलू पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष बाकल यांनी केला. रविवारी या दोघांनाही पकडण्यात पोलिसांना यश आले. चौकशीअंती या दोघांनीही हनुमंतची हत्याा केल्याची कबुली दिली. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.(वार्ताहर)