हजारो हेक्टरमधील पिकांची नासाडी
By Admin | Updated: July 29, 2014 23:58 IST2014-07-29T23:58:56+5:302014-07-29T23:58:56+5:30
येथील परिसरात फार मोठा पाऊस झाला नसला तरी मध्य प्रदेशातील संततधार पावसाने अप्पर वर्धा व लोअर वर्धा या दोन्ही धारणाचे सर्वच दरवाजे उघडे करून पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ त्यामुळे वर्धा नदीला पूर आला़

हजारो हेक्टरमधील पिकांची नासाडी
फणिंद्र रघाटाटे - रोहणा
येथील परिसरात फार मोठा पाऊस झाला नसला तरी मध्य प्रदेशातील संततधार पावसाने अप्पर वर्धा व लोअर वर्धा या दोन्ही धारणाचे सर्वच दरवाजे उघडे करून पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ त्यामुळे वर्धा नदीला पूर आला़ त्यामुळे रोहणा परिसरातून वाहणाऱ्या भोलेश्वरी नदीला व अनेक नाल्यांचा प्रवाह वाढून रोहणा, वाई, दहयापूर, दिघी, सायखेड, वडगाव व धनोडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर जमिनीवरील पिकात पाणी शिरले. परिणामी परिसरातील हजारो शेतकऱ्यांनी दुबार-तिबार पेरणी करून जगविलेल्या पिकांची नासाडी झाली़
२७ व २८ जुलैला रोहणा परिसरात फार मोठा पाऊस झाला नाही़ तरीही वर्धा नदीला मोठा पूर आला़ मध्यप्रदेशात व अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने वर्धा नदीला पूर आला़ त्यातच अप्पर वर्धा व लोअर वर्धा धरणाचे सर्वच दरवाजे उघडे केल्याने वर्धा नदीला पूर आला़ अनेक ठिकाणी वर्धा नदीचे पाणी काठाच्या बाहेर आले. परिसरातील भोलेश्वरी नदी व नाल्यांचे पाणी वर्धा नदीला येवून मिळते. पण ते पाणी वर्धा नदीत सामावू शकत नसल्याने मागे सरकू लागले़ परिणामी नदी नाल्यांना थोप येवून त्यांचे पाणी परिसरातील शेतात पसरले़ यात रोहणा येथील गजानन थोटे, प्रकाश थोटे, शरद कडू, प्रमोद केने, सुरेश चाफले, लक्ष्मण थोटे, रावसाहेब वाघ, देवीदास मांढरे, सतीश जुवारे, सतीश आटे, संजय रणनवरे, सुभाष वाघ, बाळा शिंदे, विनायक डहाके यांच्यासह अनेकांचे तसेच दिघी, सायखेड, वडगाव व धनोडी येथील अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील दुबार-तिबार पेरणीनंतरचे पीक पूर्णत: खराब झाले़ सर्व शेतकऱ्यांनी १५, १६ व १७ जून रोजी झालेल्या पावसानंतर पेरणी केली होती़ पण नंतरच्या तीव्र उन्हात सदर पेरणी वाया गेली़ दुसरी पेरणी २३ जुलैला आलेल्या पुरात खराब झाली़ नुकतीच या सर्व शेतकऱ्यांनी २४ जुलैपासून तिबार पेरणी केली. पण २८ जुलैला आलेल्या पुरात पुन्हा नुकतेच अंकुरलेले पीक नष्ट झाले़ वर्धा नदीला पूर असताना धरणातील पाणी सोडल्यावर नदी काठावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येते़ पण ही बाब लोअर व अप्पर वर्धा प्रकल्पातील वरिष्ठ अभियंते मानायला तयार नाही. म्हणून रोहणा येथील पीडित शेतकऱ्यांनी प्रकल्पातील वरिष्ठ अभियंत्यांना शेतात पसरलेले पाणी पाहण्याची विनंती केली. अनेकांनी येण्याचे टाळत साईट सुपरवायझर डांगोरे यांना पूरपरिस्थितीचे अवलोकन करून अहवाल सादर करण्याचा तोंडी आदेश दिला़ शेतकऱ्यांनी डांगोरे यांना सोबत नेवून नुकसान दाखविले़ असता त्यांनीही पिके नष्ट झाल्याची बाब मान्य केली. दरवर्षीच हे नुकसान होत असल्याने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी होत आहे़