लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : तब्बल दहा वर्षांनंतर जिल्ह्याला वर्धेचे आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. आता तब्बल ११ वर्षांनंतर त्यांच्या रूपाने जिल्ह्यातील मंत्री पालकमंत्री बनले आहे.
डॉ. भोयर यांनी तिसऱ्यांदा विजय खेचून आणला आहे. त्यांनी विजयाची हॅटट्रिक साधली. शिवाय हिंगणघाट, देवळी, आर्वीतूनही भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. मंत्रिमंडळात डॉ. भोयर यांची वर्णी लागल्याने दहा वर्षानंतर जिल्ह्याचा मंत्रिपदाचा दुष्काळ संपला होता. आता तेच पालकमंत्री झाले आहे. देवळीचे तत्कालीन आमदार रणजित कांबळे यांच्या रूपाने जिल्ह्याला २००४ ते १४ पर्यंत मंत्रिमंडळात स्थान होते. २०१३ ते १४ च्या दरम्यान रणजित कांबळे काही महिन्यांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले होते.
आता जिल्ह्याचे पालकत्व डॉ. पंकज भोयर यांची राजकीय सुरुवात युवक काँग्रेसच्या माध्यमातून झाली. २००२ मध्ये जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. २००५ मध्ये त्यांनी दांडी मार्चमध्ये सहभाग घेतला. २०१४ मध्ये ते भाजपमध्ये दाखल झाले. लगेच भाजपने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. तेव्हापासून ते आमदार आहे. आता प्रथम ते आमदाराचे 'नामदार' झाले आणि आता जिल्ह्याचे पालकत्व त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
विविध विभागआत्तापर्यंत बाहेर जिल्ह्यातील मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद होते. दहा वर्षांनंतर डॉ. पंकज भोयर यांच्या रूपाने राज्यमंत्रिपद मिळाले होते. त्यांच्याकडे शालेय शिक्षण, गृह (ग्रामीण), सहकार, गृहनिर्माण, खनिकर्म आदी विभाग सोपविण्यात आले होते. आता पालकमंत्रिपद त्यांच्याकडेच सोपविण्यात आले आहे.
जिल्ह्याच्या विकासाला मिळणार चालना राज्यमंत्रिपदासह आता पालकमंत्री म्हणून डॉ. पंकज भोयर यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्याच्या वेगवान विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः त्यांच्याकडे असलेल्या विभागांच्या माध्यमातून जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो. शिक्षण, गृह, सहकार ही महत्त्वाची खाती त्यांच्याकडे आहे. त्याच जोडीला आता पालकमंत्रिपद चालून आल्याने जिल्ह्यातील जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
विद्यापीठाचे कलर होल्डर डॉ. पंकज कांचन राजेश भोयर यांचे शिक्षण बी.एससी. एम.ए. अर्थशास्त्र, पीएच.डी. पर्यंत झाले आहे. २०१४ पासून ते सतत वर्धेचे आमदार आहेत. तत्पूर्वी ते काँग्रेसमध्ये होते. त्यांनी नागपूर विद्यापीठाचे हँडबॉलमध्ये राष्ट्रीयस्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. हँडबॉलमध्ये ते विद्यापीठाचे कलर होल्डर आहे. त्यांनी नागपूर विद्यापीठ अर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थी विभाग परिषदेचे अध्यक्षपदही भूषविले आहे.
आई अन् बाबांच्या जन्मदिनी मिळाली होती यापूर्वी अनोखी भेट २३ नोव्हेंबरला मतमोजणी होती. त्याच दिवशी डॉ. पंकज भोयर यांच्या मातोश्री कांचन राजेश भोयर यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांना तिसऱ्यांदा आमदारकी मिळाली. नंतर १५ डिसेंबरला त्यांचे पिता डॉ. राजेश भोयर यांचा वाढदिवस होता. त्या दिवशी त्यांना राज्यमंत्रिपदाची भेट मिळाली. आई, बाबांच्या जन्मदिनाची त्यांना अनोखी भेट मिळाली. आता त्यांना जिल्ह्याचे पालकत्व मिळाले आहे. हा दुग्धर्शकरा योग जुळून आला आहे. आता जिल्ह्याचा विकास हेच ध्येय असणार आहे. जिल्हावासीयांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या आहेत. विकासाला गती मिळण्याची शक्यता आहे.