कृषिपंप धारकांचा वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याला घेराव
By Admin | Updated: August 19, 2014 23:52 IST2014-08-19T23:52:36+5:302014-08-19T23:52:36+5:30
कृषिपंपाला पुरविल्या जाणाऱ्या विजेसंदर्भात पवनारच्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धडक दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून उपस्थित अभियंत्याला

कृषिपंप धारकांचा वीज वितरणच्या कार्यकारी अभियंत्याला घेराव
पवनार : कृषिपंपाला पुरविल्या जाणाऱ्या विजेसंदर्भात पवनारच्या शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मंगळवारी सकाळी धडक दिली. यावेळी विविध विषयांवर चर्चा करून उपस्थित अभियंत्याला घेराव करण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला ग्रामपंचायतीच्यावतीने सहाय्य करण्यात आले. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान शेतीकरिता रोज आठच तास वीज पुरविली जाते. त्यामध्ये चार दिवस दुपारी व तीन दिवस रात्रीचा वीज पुरवठा केला जातो. तसेच वीज पुरवठा काळात दुरूस्तीकरिता सुद्धा वीज पुरवठा बंद केली जाते. त्यामुळे आठवड्याचा विचार केला तर दररोज सरासरी फक्त सहा तास वीज मिळते, त्यातही रात्री देण्यात येणारा विजपुरवठा केव्हाही खंडीत केला जातो. त्यामुळे शेतकऱ्याला रात्र शेतातच काढावी लागते. शिवाय लाईन मध्ये काही बिघाड झाल्यास तो दोन-दोन दिवस दुरूस्त होत नाही. या व अशा प्रकारच्या अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्यावतीने धरणे देण्यात आले.
प्रथम कनिष्ठ अभियंता एस.डी.चोरे यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी या संदर्भात निर्णय देण्यास असमर्थता दर्शविली. वरिष्ठ उपकार्यकारी अभियंता एस.डब्ल्यू. पूरी यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी उपस्थितांची समज काढण्याचा प्रयत्न केला. भारनियमन ठरविणारी एक स्वतंत्र्य यंत्रणा असून मुंबई वरून वेळा ठरविल्या जातात. सदर मागण्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचवू, यावर कृषी पंप धारकांचे समाधान न झाल्याने कार्यकारी अभियंता एन.जी.वैरागडे यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी दिवसा वीज देऊन रात्रीचे भारनियमन घ्यावे, कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, विद्युत पुरवठ्याच्या काळात झालेला बिघाड लवकर दुरूस्त करावा आदी मागण्या करण्यात आल्या.
आंदोलनाकरिता परिसरातील २०० शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला, सरपंच अजय गांडोळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष जगदीश वाघमारे, श्रीकांत तोटे, नितीन कवाडे, अशोक भट, प्रमोद लाडे, दिलीप वैद्य, शालीनी आदमने, नंदा उमाटे, वर्षा बांगडे, संगीता धाकतोड, अर्चना डगवार, संगीता मेहरकूरे सर्व ग्रा.पं.सदस्य अरुण घुगरे, सुरेश इखार, सुभाष छापेकर यांच्यासह शेतकऱ्यांचा सहभाग होता.(वार्ताहर)