८५० किमीच्या वर्धा-कराड प्रवासाला मारूती चितमपल्लींकडून हिरवी झेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 14:08 IST2018-11-19T14:06:41+5:302018-11-19T14:08:42+5:30
पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त सायकलने भ्रमंती करावी असा संदेश देणाऱ्या ८५० किमीच्या वर्धा-कराड या सायकल यात्रेचा शुभारंभ पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखवून केला.

८५० किमीच्या वर्धा-कराड प्रवासाला मारूती चितमपल्लींकडून हिरवी झेंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवायचे असतील तर पक्षीमित्रांनी पक्षी संवर्धनासाठी पुढे आले पाहिजे. इतकेच नव्हे तर शाळकरी मुला-मुलींमध्ये पक्षीप्रेम निर्माण केले पाहिजे. तसेच पक्ष्यांचे अधिवास प्रदुषणमुक्त ठेवण्यासाठी प्रत्येकाने जास्तीत जास्त सायकलने भ्रमंती करावी असा संदेश देणाऱ्या ८५० किमीच्या वर्धा-कराड या सायकल यात्रेचा शुभारंभ पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. ही सायकल यात्रा बहार नेचर फाऊंडेशनच्यावतीने आयोजित करण्यात आली आहे. सदर सायकल स्वार कराड येथे आयोजित दुसऱ्या अ.भा. आणि ३२ व्या महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलनात सहभागी होणार आहेत.
कराड येथे २३ व २४ नोव्हेंबरला पक्षीमित्र संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात बहार नेचन फाऊंडेशनचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच वर्ध्यातील पक्षी मित्र सहभागी होणार आहेत. या संमेलनात सहभागी होणाºया वर्धेच्या पक्षी प्रेमींनी समाजाला पक्षी संवर्धनाचा संदेश देण्याचे निश्चित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून बहार नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रा. किशोर वानखडे व महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे विदर्भ समन्वयक तसेच बहारचे सचिव दिलीप वीरखडे हे वर्धा ते कराडपर्यंतचा प्रवास सायकलने करणार आहेत. ते शनिवारी कराडच्या दिशेने रवाना झाले आहे. या सायकलवारीला अरण्य ऋषी तथा पक्षी तज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी संजय इंगळे तिगावकर, डॉ. जयंत वाघ, पराग दांडगे, स्नेहल कुबडे, विनोद साळवे, रवींद्र पाटील, राहुल तेलरांधे, बाबाजी घेवडे, दीपक गुढेकर, मुरलीधर बेलखोडे, बी. एस. मिरगे, राजेंद्र लांबट, कौशल मिश्रा, अजय तिगांवकर, जयंत सबाने, वैभव देशमुख, अविनाश भोळे, राहुल वकारे, दर्शन दुधाने, सारांश फत्तेपुरिया, राजेंद्र लांबट, ज्योती तिमांडे, प्राजक्ता वीरखडे, डॉ. स्वाती पाटील, अनघा लांबट, पार्थ वीरखडे आदींची उपस्थिती होती.
सहा दिवसांचा प्रवास
वर्धेवरुन निघालेली ही सायकलवारी कारंजा, मेहकर, लोणार, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, बारामती, सातारा, मार्गे कराडला सहा दिवसात पोहोचणार आहे. हे सायकलस्वार सहा दिवसांच्या कालावधीत एकूण ८५० किमीचा प्रवास करणार आहे. हे सायकलस्वार ठिकठिकाणी थांबून निसर्ग प्रेमींशी संवाद साधणार आहेत.
असा राहणार प्रवास
१७ नोव्हेंबरला वर्धा ते कारंजा १३६ किमीचा प्रवास
१८ नोव्हेंबर कारंजा-मालेगाव-मेहकरपर्यंतचा ११० किमीचा प्रवास
१९ नोव्हेंबर मेहकर-लोणार-सिंदखेडराजा-जालनापर्यंतचा १२५ किमीचा प्रवास
२० नोव्हेंबर जालना-औरंगाबाद-अहमदनगरपर्यंतचा १७६ किमीचा प्रवास
२१ नोव्हेंबर अहमदनगर-दौंड-बारामतीपर्यंतचा १४९ किमीचा प्रवास
२२ नोव्हेंबर बारामती-सातारा-कराडपर्यंतचा १३७ किमीचा प्रवास