पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू होणार! जिल्हा प्रशासनाने दिली हिरवी झेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2021 02:49 PM2021-10-31T14:49:16+5:302021-10-31T14:59:24+5:30

वर्धा जिल्हा प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. असे असले तरी पॅसेंजर रेल्वेगाड्या नेमक्या केव्हा सुरू करायच्या याबाबतचा ठोस निर्णय रेल्वेचा नागपूर विभाग घेणार आहे.

Green flag given by district administration for Passenger trains | पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू होणार! जिल्हा प्रशासनाने दिली हिरवी झेंडी

पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू होणार! जिल्हा प्रशासनाने दिली हिरवी झेंडी

Next
ठळक मुद्देरेल्वेचा नागपूर विभाग घेणार ठोस निर्णयकोविड संकटामुळे बंद होत्या रेल्वेगाड्या

वर्धा : काेविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून पॅसेंजर रेल्वेगाड्या बंद होत्या; पण आता राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्हा प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. त्याबाबतचे पत्र रेल्वेच्या नागपूर विभागाला पाठविण्यात आले असून, रेल्वेचा नागपूर विभाग आता पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्याबाबत ठोस निर्णय घेणार आहे.

अमरावती व नागपूर जिल्ह्यातील वर्धा जिल्ह्यात, तर वर्धा जिल्ह्यातील अनेक व्यक्ती रोजगार किंवा शिक्षणासाठी अमरावती, तसेच नागपूर जिल्ह्यात दररोज ये-जा करतात. या व्यक्तींसाठी नागपूर- अमरावती, नागपूर-भुसावळ, नागपूर- काजीपेठ तसेच वर्धा-बल्लारशाद या पॅसेंजर रेल्वेगाड्या लोकवाहिनीच आहेत. परंतु, कोविड संकटात जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनपासून या चारही रेल्वेगाड्या बंद आहेत. त्यामुळे विविध कामानिमित्त ये- जा करणाऱ्यांना नाहक त्रास सहन करून खासगी किंवा इतर सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे.

काेविड संसर्गाचा जोर ओसरताच राज्य परिवहन महामंडळाची प्रवासी बससेवा सुरू करण्यात आली; पण रेल्वे विभागाकडून पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू न करण्यात आल्याने या चारही पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्याची मागणी होत आहे. या मागणीवर सहानुभूतीपूर्वक विचार करून, तसेच शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून वर्धा जिल्हा प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. त्याबाबतचे पत्र अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी वर्धा यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करून ते विभागीय रेल्वे प्रबंधक मध्य रेल्वे नागपूर यांना पाठविण्यात आले आहे. असे असले तरी पॅसेंजर रेल्वेगाड्या नेमक्या केव्हा सुरू करायच्या याबाबतचा ठोस निर्णय रेल्वेचा नागपूर विभाग घेणार आहे.

वर्धा जिल्ह्यातून धावायच्या या पॅसेंजर रेल्वेगाड्या

कोविड संकटाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या लॉकडाऊनपूर्वी वर्धा जिल्ह्यातून नागपूर- अमरावती, नागपूर-भुसावळ, नागपूर- काजीपेठ, तसेच वर्धा बल्लारशाह या चार रेल्वेगाड्या धावत होत्या; पण लॉकडाऊननंतर त्या बंद झाल्या, तर आता जिल्हा प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिल्याने या चारही रेल्वेगाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्ह्यात रेल्वेचे १०७ किमीचे जाळे

वर्धा जिल्ह्यातून नागपूर- मुंबई आणि नागपूर-चेन्नई हे दोन मुख्य रेल्वेमार्ग गेले आहेत. सिंदी ते पुलगाव सुमारे ७० किमी, तर वर्धा ते येणोरा सुमारे ४७ किमी, असे एकूण वर्धा जिल्ह्यात रेल्वेचे एकूण १०७ किमीचे जाळे असल्याचे सांगण्यात आले.

वर्धा जिल्हा प्रशासनाने पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी हिरवी झेंडी दिली आहे. कोविड संकट ओसरल्याने व तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर असल्याने नागरिकांची मागणी लक्षात घेऊन रेल्वेच्या नागपूर विभागाने वेळीच पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू कराव्यात.

-नरेंद्र सुरकार, सचिव, विद्यार्थी प्रवासी मित्र मंडळ, सिंदी (रेल्वे)

Web Title: Green flag given by district administration for Passenger trains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.