धान्य व्यापाऱ्याची हत्या?
By Admin | Updated: November 29, 2014 01:55 IST2014-11-29T01:55:55+5:302014-11-29T01:55:55+5:30
सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धान्याचे व्यापारी सुधाकर लक्ष्मण दाते (५५) यांचा ...

धान्य व्यापाऱ्याची हत्या?
हिंगणघाट : सेलू तालुक्यातील येळाकेळी येथील धान्याचे व्यापारी सुधाकर लक्ष्मण दाते (५५) यांचा शुक्रवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर नांदगाव चौकापासून ६०० मीटर अंतरावर संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी घटनास्थळाच्या अवलोकनावरुन अपघात नसून घातपाताची शक्यता असल्याचा संशय बळावला आहे.
अपघात झाला असता तर मृतदेह रस्त्याच्या अगदी कडेला असता. मात्र तो रस्त्यापासून काही अंतरावरील एका झाडाजवळ पडलेला आढळला. त्यातच मृतदेहाचे अवलोकन केले असता पोटावर चाकूने भोसकल्यासारख्या जखमा होत्या. यासोबतच चेहरा दगडाने ठेचून विद्रूप केल्यासारखे दिसून येत होते. अपघातात शक्यता चेहऱ्यावर ठेचल्यासारख्या जखमा होत नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत मृतकाचे नातेवाईकांशी चर्चा केली असता त्यांनीही मृतदेहावरील जखमा आणि घटनास्थळाच्या अवलोकनावरुन अपघाताची शक्यता फेटाळून लावत हा घातपातच असल्याचा आरोप केला आहे. यामुळे सदर प्रकरणात पोलिसांच्या पुढील तपासावरच प्रश्नचिन्ह लागण्याची शक्यता बळावली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सुधाकर दाते हे शेतकऱ्यांकडून कापूस, सोयाबीन, चणा व गहू खरेदी करून ते कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायचे. मागील अनेक वर्षांपासून ते हा व्यापार करीत आहे. गुरुवारी ते सकाळी ७ वाजता घरून हिंगणघाटला जात असल्याचे सांगून निघून गेले. त्यानंतर दुपारी २.३० वाजताच्या सुमारास त्यांनी घरी फोन केला होता. तेव्हा त्यांनी सोरता येथून चुकारा घेऊन येत असल्याचे सांगितले. यानंतर मात्र ते घरी पोहचलेच नाही. ते घरी न पोहचल्याने घरची मंडळी चिंतेत होती. यानंतर घरच्या मंडळींचा त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नाही, असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. अशातच त्यांचा मृतदेह आढळल्याची वार्ता आज सकाळी घरी धडकली. माहिती मिळताच सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांचे नातेवाईक घटनास्थळी पोहचले. यावेळी पोलिसांनी मृतदेह घटनास्थळावरुन हलविला होता. नातेवाईकांनी घटनास्थळाचे अवलोकन केले असता अपघाताची शक्यता त्यांना कुठेही वाटली नाही. यानंतर मृतदेहाचे अवलोकन केले असता मृतदेहावरील जखमाही अपघात झाल्यासारख्या वाटत नव्हत्या. इतकेच नव्हे, तर घटनास्थळी रक्ताचे डागसुद्धा नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुधाकर दाते यांची हत्या करून त्यांचा मृतदेह त्या परिसरात आणून टाकला असावा, अशी शक्यताही नातेवाईकांनी ‘लोकमत’शी बोलताना वर्तविली. पोलीस या प्रकरणाचा तपास कसा करतात, याकडे मृतकाच्या नातेवाईकांचे लक्ष लागून आहे. या घटनेने त्यांचा गाव असलेल्या येळाकेळी येथे शोककळा पसरली आहे.(तालुका प्रतिनिधी)