दारू विक्रेत्यांना पकडा व दोन हजार रुपये मिळवा
By Admin | Updated: September 9, 2014 23:53 IST2014-09-09T23:53:58+5:302014-09-09T23:53:58+5:30
पहिले सर्वेक्षण नंतर रहिवासी प्रमाणपत्र नाकारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला होता. यातून गावात दारूबंदी शक्य असल्याचे चित्र निर्माण झाले. अशात ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांच्या

दारू विक्रेत्यांना पकडा व दोन हजार रुपये मिळवा
किशोर तेलंग - तळेगाव(टा.)
पहिले सर्वेक्षण नंतर रहिवासी प्रमाणपत्र नाकारण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला होता. यातून गावात दारूबंदी शक्य असल्याचे चित्र निर्माण झाले. अशात ग्रामपंचायतीच्यावतीने महिलांच्या सहकार्याने दारूबंदी महिला मंडळ निर्माण करण्यात आले. आता गावात दारूविक्री करीत असलेल्या इसमास पकडा व दोन हजार रुपये मिळवा असा नवा निर्णय ग्रामपंचायतीच्यावतीने घेण्यात आला आहे.
दारूबंदी असताना तळेगाव येथे गल्लोगल्ली दारू मिळत होती. त्यामुळे गावात नेहमी वाद विवाद होत होते. शिवाय शाळकरी मुले दारूच्या आहारी गेले होते. या कारणाने गावात शांतता नांदावी यासाठी चार महिन्याअगोदर दारूबंदी बाबत सहमत व असहमत सर्वेक्षण चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी सहमत नोंदविले. यानंतर ग्रामपंचायतमध्ये दारूविक्रेत्यांची बैठक बोलावून चर्चा केली. त्यांच्याशी चर्चा करून १४ आॅगस्टपासून बंदीची घोषणा करीत गावभर दारूबंदीचे बॅनर लावून बंदी जाहीर केली. यावेळी अल्लीपूरचे ठाणेदार विजय मगर, ग्रामविकास अधिकारी हिरालाल राठोड, ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांच्या उपस्थित दारूबंदीची सभा झाली.
सभेमध्येही ठाणेदारांनी कुणी दारूविक्री करताना आढळल्यास मला भ्रमणध्वनी करा. मी फोन येताच पोलीस ताफा घेवून येईल, असे सांगतले. त्या गावात सकाळी पाच वाजतापासून दारूचे पाट वाहत होते व वादविवाद होत होते. पण आज गावात थोडी का होईना शांतता पाहायला मिळत आहे. रोज गावामध्ये पोलिसांचा ताफा येत आहे. शिवाय तेजस्वीनी महिला मंडळ दररोज गावात रात्री फिरत आहे.
महिला मंडळ दररोज गावात फिरत असल्याने या पोलिसांचे दर्शनही गावात होत असल्याने दारूविक्रेत्यांचे धाबे दणानले आहे. त्या गावात सदैव सकाळपासून दारूचे पाट वाहत होते त्या गावात शांतता नांदत आहे. शिवाय पोलीस प्रशासनाचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यात काहींनी गडबड करण्याचा प्रयत्न केला. गावातील काही विघ्नसंतोषी नागरिकांनी दारू विक्रेत्यांना मदत करीत त्यांना दारू विकण्याचा प्रयत्न चालविल्याचे समोर आले.
गावातील तेजस्वीनी महिला मंडळाच्या महिला रोजच्या वेळेत गावात गेले असता काही दारू विकत असताना आढळून आले. लगेच पोलिसाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र दारू विक्रेते पोलिसांच्या हाती आले नाही.
यामुळे दारूबंदीला जोपर्यंत गावकरी हातभार लावीत नाही तोपर्यंत पूर्णपणे अंमलबजावणी शक्य नसल्याचे समोर आले. यामुळे ग्रामपंचायतीने कुणी दारू विक्रेत्यांना पकडून दिल्यास दोन हजार रुपये पारितोषिक देण्याचा निर्णय घेण्यात आला.