कुंभमेळ्यासारख्या धार्मिक आयोजनांवर शासकीय खर्च अनाठायी
By Admin | Updated: August 21, 2015 02:36 IST2015-08-21T02:36:30+5:302015-08-21T02:36:30+5:30
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अनेक धर्म आणि परंपरा येथे एकत्र नांदतात. भारतीय राज्यघटनेने धर्माधारित व्यवस्थेला कुठलेही महत्त्व न देता धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मान्य केली आहे.

कुंभमेळ्यासारख्या धार्मिक आयोजनांवर शासकीय खर्च अनाठायी
१४ व्या राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा सूर : खुल्या गटात ३७ तर शालेय गटात ३५ स्पर्धकांचा सहभाग
आर्वी : भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. अनेक धर्म आणि परंपरा येथे एकत्र नांदतात. भारतीय राज्यघटनेने धर्माधारित व्यवस्थेला कुठलेही महत्त्व न देता धर्मनिरपेक्ष राष्ट्राची संकल्पना मान्य केली आहे. यामुळे देशातील जनतेने करापोटी शासनाकडे गोळा केलेला जनतेचा पैसा शासनाद्वारे कुंभ मेळाव्यासारख्या धार्मिक आयोजनावर खर्च करणे अनाठायी आहे. त्याचे समर्थन करता येणे कदापि शक्य नाही, असा सूर वादविवाद स्पर्धेतून उमटला.
स्थानिक आशीर्वाद मंगल कार्यालयात एनएसयुआयतर्फे दरवर्षीप्रमाणे स्व. आ.डॉ. शरद काळे स्मृती राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात आली. ही १४ वी राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धा होती. राज्याच्या विविध भागातून सहभागी झालेल्या स्पर्धकांनी आपले विचार व्यक्त केले. ‘भारतीय संस्कृतीच्या एकात्मतेचे दर्शन घडविणाऱ्या कुंभमेळा सारख्या धार्मिक आयोजनावर शासनाद्वारे होणारा कोट्यवधीचा खर्च अनाठायी नसून योग्य आहे’, हा या वादविवाद स्पर्धेच्या खुल्या गटाचा विषय होता. खुल्या गटाचे परीक्षण प्रा. अनिल कवरासे, प्रा. खडसे, सुनीता कदम यांनी केले. शालेय व खुल्या अशा दोन गटात झालेल्या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. मोरेश्वर देशमुख तर उद्घाटक म्हणून प्रा. डी.जे. नांदूरकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक शैलेष साळवी उपस्थित होते. शालेय गटाचा विषय ‘शालांत परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची त्याच सत्रात पुन्हा परीक्षा घेण्याचा शासन निर्णय योग्य आहे’ हा होता. शालेय गटाचे परीक्षण मोकदम, ताजनेकर व नाखले यांनी केले.
शालेय गटात ३५ तर खुल्या गटात ३७ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धेच्या समारोपिय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. अमर काळे तर अतिथी म्हणून बडनेरा विधानसभा मतदार संघाचे आ. रवी राणा, अ.भा. श्री गुरूदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी प्रकाश महाराज वाघ उपस्थित होते. आ. काळे यांनी भारताच्या सांस्कृतिक परंपरा व त्यातून साकारलेलया एकात्मतेमुळेच हे राष्ट्र उभे आहे. जगाला गुरूस्थानी असल्याचा उल्लेख करून आपल्याला चांगल्या परंपरांचा अंगिकार करावा. वाईट परंपरांना मुठमाती द्यावी. सर्वच क्षेत्रात असलेला भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी तरुणांनी पुढे यावे, असे आवाहनही त्यांनी केले. आ. रवी राणा, प्रकाश महाराज वाघ यांनीही विचार व्यक्त केले.
सलग आठ तास चाललेल्या स्पर्धेला आर्वी व परिसरातील श्रोते उपस्थित होते. संचालन प्रफुल क्षीरसागर यांनी केले तर आभार एनएसयुआय अध्यक्ष अंगद गिरधर यांनी मानले. स्पर्धेला एनएसयुआय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.(तालुका प्रतिनिधी)