शासकीय विश्रामगृहाची ‘घडी’ विस्कटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 06:00 IST2019-12-21T06:00:00+5:302019-12-21T06:00:11+5:30
सिव्हिल लाईन परिसरात शासकीय विश्रामगृह आहे. गुरुवारी विश्रामगृह परिसर आणि आतील भागात फेरफटका मारला असता इमारत क्रमांक २ च्या भोजनकक्षातील प्रवेशद्वारावरील एक घड्याळ केवळ ४ वाजले असताना ५ वाजून ५१ मिनिटे तर भोजनकक्षाआतील घड्याळ १२ वाजून २८ मिनिटे अशा चुकीच्या वेळा दर्शवित होत्या. विशेष म्हणजे, या कक्षाशेजारीच ‘शरद’ कक्ष आहे.

शासकीय विश्रामगृहाची ‘घडी’ विस्कटली!
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : ‘घड्याळा’ने महाराष्ट्रातील विस्कटलेली राजकीय ‘घडी’ सुस्थितीत केली. येथील शासकीय विश्रामगृहातील घड्याळी मात्र चुकीच्या वेळा दर्शवित असल्याने या विभागाची ‘घडी’ सद्यस्थितीत विस्कटल्याचे चित्र आहे.
सिव्हिल लाईन परिसरात शासकीय विश्रामगृह आहे. गुरुवारी विश्रामगृह परिसर आणि आतील भागात फेरफटका मारला असता इमारत क्रमांक २ च्या भोजनकक्षातील प्रवेशद्वारावरील एक घड्याळ केवळ ४ वाजले असताना ५ वाजून ५१ मिनिटे तर भोजनकक्षाआतील घड्याळ १२ वाजून २८ मिनिटे अशा चुकीच्या वेळा दर्शवित होत्या. विशेष म्हणजे, या कक्षाशेजारीच ‘शरद’ कक्ष आहे. या नावाभोवतीच सध्या अवघ्या महाराष्ट्राचे राजकारण फिरत आहे आणि शरद ऋतूलादेखील प्रारंभ झाला आहे. या ऋतूत निसर्ग कूस बदलतो. वृक्षांना हिरवीकंच पालवी फुटते आणि निसर्ग कात टाकतो. घड्याळ चिन्ह असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांच्यामुळे अनेक पक्षांनीही मरगळ झटकली आहे. सत्तास्थापनेदरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील विस्कटलेली राजकीय ‘घडी’ रुळावर आणली. मात्र, शासकीय विश्रामगृहातील घड्याळी चुकीच्या वेळा दाखवून संपूर्ण घटनाक्रमातील विरोधाभास दर्शवित आहे. विश्रामगृहातील बंद घड्याळींमुळे संपूर्ण विषयच गमतीदार झाला असून विश्रामगृह प्रशासनाच्या डुलक्याही यातून दिसत आहेत.
विश्रामगृहात सातत्याने व्हीआयपी व्यक्तींची ये-जा सुरू असते. अशा स्थितीत बंद घड्याळी दिशाभूल करणाऱ्या ठरत आहेत. याकडे कर्मचारी आणि कार्यभार असणाºया सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याचेही सपशेल दुर्लक्ष आहे. घड्याळांची घडी सुस्थितीत करण्याची गरज व्यक्त होत आहे.
हा हलगर्जीपणाच म्हणावा!
शासकीय विश्रामगृहात व्हीआयपी, व्हीव्हीआयपींची सातत्याने ये-जा सुरू असते. त्यामुळे येथील व्यवस्था ही नीटनेटकीच असायला हवी. मात्र, विश्रामगृह प्रशासनाकडून अनेक कामात हलगर्जीपणा केला जात असल्याचे दिसून येते. साधे घड्याळ कित्येक दिवसांपासून बंद असताना संबंधित अभियंत्याचे लक्ष कसे गेले नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. कार्यकारी अभियंत्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.