शेतकरी आत्महत्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
By Admin | Updated: December 16, 2014 22:59 IST2014-12-16T22:59:27+5:302014-12-16T22:59:27+5:30
बदलत्या हवामानाचा विपरित परिणाम होत असल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. गत तीन-चार वर्षांपासून विदर्भात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शेतकरी कसा-बसा तग धरून आहे़

शेतकरी आत्महत्यांकडे शासनाचे दुर्लक्ष
दुष्काळातही आबाळ : भाव अल्प; मदत गरजेची
सेलगाव (लवणे) : बदलत्या हवामानाचा विपरित परिणाम होत असल्याने शेती दिवसेंदिवस तोट्यात जात आहे. गत तीन-चार वर्षांपासून विदर्भात दुष्काळसदृश्य स्थिती असताना शेतकरी कसा-बसा तग धरून आहे़ यंदाही निसर्गाच्या प्रकोपामुळे पिके हातची गेली़ यामुळे शेतकरी आत्महत्यांत वाढ होत आहे़ असे असताना शासन आत्महत्यांकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत़
खरीप हंगामात पाऊस उशिरा व कमी आला़ अनियमित पावसामुळे दुबार-तिबार पेरण्या कराव्या लागल्या. एक महिना पावसाने दडी मारल्याने पिके वाळली़ उर्वरित पिकांची वाढ झाली नाही. यामुळे उत्पन्नात मोठी घट आली़ खर्चही निघाला नाही. सोयाबीन, भुर्इंमुंग, मुंग, उडीद या पिकांनी दगा दिल्याने शेतकऱ्यांना कापसाचा आधार होता; पण कपाशीवर लाल्या रोगाचे आक्रमण झाले़ तुरीनेही किडीच्या आक्रमणामुळे खाली मान टाकली. रब्बी हंगामही निसर्गावरच अवलंबून आहे. अत्यल्प पावसामुळे भूजल पातळी खालावली असून विहिरी, नाले कोरडे पडत आहे. यामुळे ओलित कसे करायचे, रबी हंगामही हातचा जाणार काय आदी प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे़ शिवाय जनावरांना चारा आणायचा कुठून, हाही प्रश्नच आहे़ स्वत:सह गुरांची सोय लावणे कठीण होत असल्याने पुढील जीवन जगावे तरी कसे, या विंवचनेत शेतकरी सापडला आहे. नैराश्यातून आत्महत्या वाढत आहेत़ राज्य व केंद्र शासन मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे़ शासन, प्रशासन शेतकरी आत्महत्या गांभीर्याने घेत नसून उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे़ भविष्यातील अडचणींचा विचार करून शासनाने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, भरीव आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़(वार्ताहर)