शासनाला आश्वासनांचा विसर
By Admin | Updated: November 13, 2015 02:03 IST2015-11-13T02:03:58+5:302015-11-13T02:03:58+5:30
किसान अधिकार अभियानमार्फत शासन प्रशासनाच्या धोरणांविरूध्द बंड पुकारण्याचे बळ एकवटण्यासाठी ‘बळी महोत्सव’ २४ तास आत्मक्लेश ...

शासनाला आश्वासनांचा विसर
बळी महोत्सव कार्यक्रम : किसान अधिकार अभियानचा आरोप
वर्धा : किसान अधिकार अभियानमार्फत शासन प्रशासनाच्या धोरणांविरूध्द बंड पुकारण्याचे बळ एकवटण्यासाठी ‘बळी महोत्सव’ २४ तास आत्मक्लेश आत्मिंचतन आंदोलन बजाज चौक येथे राबविले. अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, सहकारी मित्र व शहरातील संवेदनशील, पुरोगामी संघटनाच्या कार्यकर्त्यांनी यात सहभाग नोंदविला.
शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दलीत व आदिवासी जनतेला शासनाच्या चूकीच्या धोरणांमुळे व प्रशासनातील संगठीत असंवेदनशील मूठभर उच्च पदस्थ नोकरशाहांच्या नकारात्मक वृत्तीमुळे सतत शोषणाचे बळी होत असलेल्या बळी राजाच्या वारसांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा व ग्रामीण भागातील धान्याच्या निर्मितीचा, लक्ष्मीचा आगमनाचा उत्सव हे बहुसंख्य बहुजन बांधवांच्या जीवनात साजरा करू शकत त्यांच्या समवेदना अनुभवण्यासाठी सदर आंदोलन असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाची भूमिका काकडे यांनी व्यक्त केली. येत्या हिवाळी अधिवेशनात शासनाला त्यांनी निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना दिलेल्या वचननाम्याची वचनपूर्ती करा, असा आग्रह धरण्यात येणार असल्याचे सांगितले. निवडणुकीच्या काळात दिलेले एकही वचन राज्यकर्त्यांनी पाळले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. किसान अधिकार अभियानचे मार्गदर्शक श्रीकांत बारहाते यांनी शासनाचे शोषित वर्गाकडे होत असलेले दुर्लक्ष हे जाणीवपुर्वक असून शेतकरी-शेतमजूर हा त्यांच्या विकासाच्या दृष्टीक्षेत्रातील समाज नाही. आपल्याला सरकारपुढे ठामपणे आपल्या असण्याची जाणीव आंदोलनामधून करून द्यावी लागणार आहे, असे मत व्यक्त केले. प्रा. नुतन माळवी यांनी बळीमहोत्सव कार्यक्रमाची भूमिका विषद केली. या बळीमहोत्सवात आपण संघर्ष व शिक्षणाचा संकल्प करण्यासाठी एकत्र येत असल्याची माहिती उपस्थितांना दिली. या कार्यक्रमात बळीराजा गौरव सन्मान किन्ही (आष्टी) येथील राणी दुर्गावती दारूबंदी महिला मंडळ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. ज्योति लुंगे यांना गौरवान्वीत करण्यात आले.
२४ तास आत्मक्लेश, आत्मचिंतन बळीमहोत्सव कार्यक्रमाचे संचालन किसान अधिकार अभियानचे जिल्हाध्यक्ष सुदाम पवार यांनी केले. यावेळी झालेल्या खुल्या चर्चेत अभियानचे पदाधिकारी व विविध पुरोगामी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सहभागी होत चर्चा केली. कार्यक्रमाकरिता सर्वांनी सहकार्य केले.(प्रतिनिधी)
राज्य शासनाचा वचननामा
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा कमीत कमी ५० टक्के जास्त नफ्याची खात्री मिळेल अशी योजना आखण्यात येईल. स्वस्त दरात शेती साधनांची व निविष्ठांची उपलब्धता करून देवू, कमी दरात शेती पीक कर्जाची उपलब्धता शेतकऱ्यांना करून देवू, जिल्ह्यात जास्त उत्पादन देणाऱ्या बियाण्यांच्या संस्कारक्षम प्रयोगशाळा. धान्य साठवणूक केंद्राची निर्मिती, शेती विमा योजना अंमलात आणू. प्रत्येक जिल्ह्यात फिरती माती परिक्षण प्रयोगशाळांची निर्मिती करू. जमीन वापरासाठी राष्ट्रीय नीती आखू व अमलात आणू. पंतप्रधान ग्रामसिंचन योजनेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाणीपुरवठा देवू यातील एकही वचन पूर्ण झाले नाही.